HSRP number plate  File Photo
कोल्हापूर

HSRP Number Plate | एचएसआरपी नंबर प्लेटसाठी शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन; इचलकरंजीत दीड लाख वाहनधारकांची नोंदणी रखडली

Kolhapur News | फिटमेंट सेंटरवर नंबर प्लेट बसवण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासन्तास रांगेत थांबावे लागले

पुढारी वृत्तसेवा

High Security Registration Plate  Ichalkaranji RTO

पंकज चव्हाण

इचलकरंजी : वाहनांसाठी अनिवार्य असलेल्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवण्याच्या शेवटच्या दिवशीच ऑनलाईन सर्व्हर ठप्प झाल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. शहरातील आरटीओ कार्यालय आणि अधिकृत फिटमेंट सेंटरवर नंबर प्लेट बसवण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासन्तास रांगेत थांबावे लागले. इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तब्बल १,६७,६४२ वाहनधारकांची नोंदणी अद्यापही प्रलंबित आहे.

वाहनधारकांना आधीच ऑनलाईन स्लॉट बुक करून नियोजित वेळेनुसार सेंटरवर हजर राहावे लागते. मात्र, आज सकाळपासून सर्व्हर डाऊन झाल्याने नोंदणी, पेमेंट आणि प्लेट बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी, अनेकांना वेळ वाया घालवून परतावे लागले, तर काहींना रांगेत थांबूनही काम न झाल्याने नाराजी व्यक्त केली.

तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनी वारंवार होणाऱ्या या तांत्रिक अडचणींमुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढल्याची तक्रार केली असून, अधिक स्थिर व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

HSRP प्लेट बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट असून, आज शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी मोबाईल व संगणकावरून नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शासनाने यापूर्वी दोनदा मुदतवाढ दिली असली, तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर वाहनांची नोंदणी शिल्लक आहे. आता पुन्हा मुदतवाढ मिळणार की नियम मोडणाऱ्यांना दंड भरावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण २,७०,००० वाहनांना HSRP प्लेट बसवणे बंधनकारक आहे. त्यापैकी केवळ १,०२,००० वाहनधारकांनी नोंदणी केली असून, प्रत्यक्षात फक्त ५३,००० वाहनांवरच प्लेट बसवण्यात आल्या आहेत. फिटमेंट एजन्सींची संख्या कमी असल्याने नोंदणी करूनही वाहनधारकांना प्लेट मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT