

डोंबिवली : महाराष्ट्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा वाहन क्रमांक प्लेट (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट - HSRP) बसविणे बंधनकारक करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहेत. त्यानुसार कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत वाहनांवर एचएसआरपी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे.
एचएसआरपी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (High Security Registration Plate) बसविण्यासाठी परिवहन विभागाकडून कल्याण उपप्रादेशिक कार्यालयाकरता मे. रियल माझोन इंडिया एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठी लागणारे शुल्कही निर्धारित करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून अशा नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसह वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत, छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी, तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटविण्याकरिता या व अशा अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोटार वाहनांवरील हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (High Security Registration Plate) बसविणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सर्व मोटार वाहनांवर अशा नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी केले आहेत.
राज्यात सन 2019 पासून नव्या उत्पादित वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट (High Security Registration Plate) सक्तीची केली आहे. वाहनाला ही नंबरप्लेट एकदा लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली नंबरप्लेट टॅम्परप्रुफ असते. ही नंबरप्लेट अल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनविलेली असते. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम आणि वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत IND अशी अक्षरे लिहिलेली असतात.
एचएसआरपी हाय सिक्यूरिटी नंबरप्लेटचे महत्व लक्षात घेता कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP - High Security Registration Plate) नंबरप्लेट बसविणे अनिवार्य असून त्याकरीता परिवहन विभागाने या कार्यालयासाठी नियुक्त केलेल्या मे. रियल माझोन इंडिया एजन्सीकडून ही नंबरप्लेट बसवून घेता येणार आहे.
त्यासाठी जीएसटी वगळून दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रूपये, तीन चाकीसाठी 500 रूपये, हलकी मोटार वाहने / पॅसेंजर कार / मिडियम कमर्शियल वाहन / अवजड कमर्शियल वाहन आणि ट्रेलर / कॉम्बिनेशनकरिता 745 रूपये इतके शुल्क निर्धारित केले आहे. नियुक्त केलेली एजन्सी आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात आपले फ्रँचायझी सुरु करुन वाहनांना नंबरप्लेट लावण्याचे काम करणार आहे. या संदर्भातली माहिती निर्देश एचएसआरपी बुकिंग पोर्टल लिंक लवकरच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.
परिवहन विभागाने 31 मार्च 2025 पर्यंत जुन्या वाहनांना देखील एचएसआरपी नंबरप्लेट लावणे अनिवार्य केले आहे. परिवहन विभागाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व जुन्या वाहनांना त्यांची कागदपत्रे तपासून संबंधित एजन्सीकडून एचएसआरपी नंबरप्लेट लावून मिळणार असल्याची माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.