How to identify an authentic Devgad Hapus mango? Learn the trick
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने हापूस आंबा खरेदीला दरवर्षी मोठी गर्दी असते. आज सुद्धा कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस आंब्याची मोठी आवक झाली. ग्राहक सुद्धा मोठी गर्दी करताना दिसत आहेत. प्रत्येकाला हापूस आणि विशेष करून देवगड हापूस आंबा चाखायला हवा असतो. मात्र हापूस नेमका ओळखायचा कसा ? त्याची काय वैशिष्ट्य असतात ? या विषयी जाणून घेऊया.
सुगंध : अस्सल हापूसचा 'सुगंध' हीच त्याची सर्वात मोठी ओळख आहे...
पिकलेल्या हापूसचा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळतो. देठाच्या जवळ नाकाला लावून बघितल्यास नैसर्गिक गोड सुगंध येतो. जर आंब्याला सुगंध नसेल किंवा रसायनाचा वास येत असेल तर, तो हापूस नाही असे समजावे.
हापूसचा आकार आणि साल :
हापूस आंबा साधारणपणे अंडाकृती आणि गोलाकार असतो. तो खालच्या बाजूने जास्त टोकदार नसतो. हापूसची साल अतिशय पातळ आणि मऊ असते.
हापूस आंब्याचा रंग :
नैसर्गिकरीत्या पिकलेला हापूस हा गडद पिवळा आणि काहीसा केशरी छटा असलेला दिसतो. जर आंबा पूर्णपणे एकसारखा पिवळधमक दिसत असेल आणि देठाकडचा भाग हिरवा असेल, तर तो केमिकल वापरून पिकवलेला असण्याची शक्यता असते. हापूस म्हणून कर्नाटकी आंबा सुद्धा विकला जातो. त्याचा रंग पिवळा आणि चवीला थोडा आंबट सुद्धा असू शकतो.. हापूसच्या गराचा रंग गडद केशरी असतो.
देवगड आणि रत्नागिरी हापूस :
या दोन्ही भागातील हापूस उत्तम असतात. देवगडच्या हापूसची साल थोडी जास्त पातळ असते, तर रत्नागिरी हापूसचा रंग थोडा जास्त गडद असू शकतो. मात्र कर्नाटक हापूस दिसायला हापूससारखाच असतो, पण तो खाताना थोडा आंबट-गोड लागतो आणि त्याचा सुगंध हापूस इतका तीव्र नसतो. त्यामुळे अक्षय तृतीया निमित्ताने आंबे खरेदीला जात असाल तर या गोष्टी नक्की पाहा...