India Census 2026 file photo
कोल्हापूर

१ मे पासून घर जनगणनेला सुरुवात; नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन

India Census 2026 | प्रशिक्षण पूर्ण; अचूक माहिती देण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : शहराच्या विकासाला गती देण्यासाठी घर जनगणना प्रक्रियेला नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सौ. मनीषा डांगे यांनी पत्रकार परिषदेत केले. केंद्र शासनाच्या जनगणना मोहिमेअंतर्गत घर जनगणना (घर नोंदणी) टप्प्याला १ मेपासून सुरुवात झाली असून, यासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा डांगे म्हणाल्या शहरात जनगणना प्रक्रियेपूर्वी प्रात्यक्षिक स्वरूपात काही घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या माध्यमातून प्रक्रियेची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. नागरिकांनी जनगणना अधिकाऱ्यांना प्रामाणिक व अचूक माहिती देऊन सहकार्य करणे आवश्यक आहे, कारण ही माहिती भविष्यातील विकास आराखडे आणि शासकीय योजना ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षक अधिकारी अमर पाटील व विराज थोरात यांनी शहरातील काही घरांना भेट देत प्रत्यक्ष सर्वेक्षणाची चाचणी घेतली आहे. या मोहिमेसाठी ९ पर्यवेक्षक आणि ५२ प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

घर जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती, मालकी हक्क, खोल्यांची संख्या, पाणी व वीज सुविधा, शौचालयाची उपलब्धता, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन तसेच कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची सविस्तर माहिती संकलित केली जाईल.

यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होत असून नागरिकांसाठी ‘स्व-नोंदणी’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून ‘एसई आयडी’च्या माध्यमातून नागरिक स्वतःही माहिती भरू शकतात.शहराच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याने नागरिकांनी जनगणना अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही नगराध्यक्ष सौ. मनीषा डांगे यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, सर्व सभापती, नगरसेवक,नगरसेविका उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT