मानोली धरण जोरदार पावसाने शनिवारी (दि.६) १०० टक्के भरले.  Pudhari News Network
कोल्हापूर

तरण्याची दमदार हजेरी; मानोली प्रकल्प 'ओव्हर फ्लो'

सांडव्यातून १०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड-आंबा मार्गावर असणारा मानोली लघु मध्यम प्रकल्प पुनर्वसू (तरणा पाऊस) नक्षत्राच्या जोरदार पावसाने शनिवारी (दि.६) १०० टक्के भरला. सांडव्यातून १०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मानोली धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे. तालुका प्रशासनाने धरण व धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असून पर्यटकांनी पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत असल्याने इकडे फिरकू नये, असे आवाहन कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी केले आहे. 

Summary

  • मानोली लघु मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला

  • सांडव्यातून १०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

  • प्रशासनाने धरण व धबधब्यावर जाण्यास बंदी

पावसाने जोर धरल्याने रोप लावणीस वेग

मानोली धरण निसर्गरम्य परिसरात असून ५.२० दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. गतवर्षी मानोली प्रकल्प १८ जुलैरोजी ओव्हर फ्लो झाला होता. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने मानोली व कडवी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तालुक्याच्या पश्चिम भागात हे धरण येते. या भागात रोप लावणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. पावसाने जोर धरल्याने भागातील रोप लावणीस वेग आला असून शेतकरी रोप लावणीच्या कामात गुंतले आहेत. निसर्ग सौदर्यांचा अप्रतिम नजारा येथे असल्याने पर्यटकांची या धरणाला अधिक पसंती असते.

कडवी धरण ५९ टक्के भरले

कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी इतकी असून आजमितीला ५९.१३ टक्के भरले आहे. धरणाची पाणीपातळी ५९४.३० मी असून उपयुक्त पाणीसाठा ४२.१२ दलघमी इतका आहे. धरण १.४९ टीएमसी भरले आहे. ८० दलघमी पाणीसाठ्यात वाढ झाली असून गत २४ तासांत ७५ मिमी पाऊस बरसला. १ जूनपासून आजअखेर ८४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी कडवी पाणलोट क्षेत्रात ४६३ मिमी पाऊस बरसला होता. गतवर्षी ६ जुलैला ३४ टक्के भरले होते. धरणातून कडवी नदीपात्रात प्रतिसेकंद १५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

मानोली धरण ओव्हर फ्लो झाल्याने येथील धबधबा कोसळू लागला आहे. गतवर्षी पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे येथे एका पर्यटकाला जीव गमवावा लागला होता. असे प्रकार घडू नये म्हणून जलसंपदा विभागाने धबधब्याच्या ठिकाणी फलक लावून सावधानतेचा इशारा दिला आहे. पर्यटकांनी प्रवाहाजवळ जाण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये. स्वतःसह, मित्र परीवार तसेच कुटुंबाची काळजी घ्यावी.
  खंडेराव गाडे, शाखा अभियंता, कडवी धरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT