Prakash Abitkar on Coldrif Syrup Ban
कोल्हापूर : कोल्ड्रिफ कफ सिरप बंदीबाबत केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार राज्य सरकारनेही औषधांबाबत योग्य ती खबरदारी घेतली आहे. दोन राज्यांमध्ये चुकीच्या औषधांचा फटका बसल्याने केंद्राने सर्व राज्यांना निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जात आहे, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज (दि.६) येथे सांगितले.
एफडीएकडूनही याबाबत योग्य ते निर्देश दिले जात आहेत. “एखाद्या कंपनीचे औषध चुकीचे असल्यामुळे सर्व औषधे चुकीची आहेत, असे नाही. स्पष्ट सूचना आल्या असून त्याप्रमाणे आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. कालच केंद्र सरकारकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली असून मिळालेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे.
आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. नगरपालिकांच्या आरक्षणाचा निकाल जाहीर होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष आता सज्ज होत आहेत. “या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांसाठी काम करत आहे आणि त्यांना बळकटी देण्याचे प्रयत्न करत आहे,” असे अबिटकर यांनी नमूद केले.
मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकार गंभीर आहे. “मी स्वतः तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधेन. मुख्यमंत्री आणि पीएम केअर निधीतून मदत करणाऱ्यांबाबत जर दिरंगाई होत असेल, तर चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
आरोग्य सुविधा वाढविण्याबाबत बोलताना अबिटकर म्हणाले, “सीपीआर सुरू झाल्यानंतरची लोकसंख्या आणि आताची परिस्थिती यात मोठा फरक आहे. शेंडा पार्कमधील हॉस्पिटल सुरू होईपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शेंडा पार्कातील नवीन हॉस्पिटल आणि सेवा रुग्णालयातील मल्टी-स्पेशालिटी विभागामध्ये आणखी 150 बेड्स वाढविण्याचे नियोजन आहे. जोपर्यंत या सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांना अडचण होणार आहे याची आम्हालाही जाणीव आहे. त्यामुळे सीपीआरमध्ये रुग्णांना प्राधान्य देण्याच्या सूचना डीनना दिल्या आहेत.”
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’ योजनेबाबत निर्णय घेण्याचे काम सुरू आहे. “याबाबत उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत चर्चा होईल. हा विषय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अखत्यारीतील आहे. पुढील आठवड्यात या विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे,” असे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी सांगितले.