कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी आपल्या प्रारंभीपासूनच्या प्रयत्नांना यश आले, अशा भावना व्यक्त करत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे अभिनंदन केले. आबिटकर यांनी डॉ. जाधव यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावा, अशी सूचना डॉ. जाधव यांनी आबिटकर यांना केली.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, यासाठी उभारलेल्या लढ्याला यश आले आहे. यामध्ये आपले योगदान अधिक आहे. राज्य शासनाचीही बेंचसाठी सकारात्मक आणि निर्णायक भूमिका राहिली आहे. याबाबत सातत्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत चर्चा झाल्या. सर्किट बेंचमुळे आता कोल्हापूर शहराच्या नव्हे, तर जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती येणार आहे.
डॉ. जाधव म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, याकरिता पहिली मागणी दैनिक ‘पुढारी’तून 14 मे 1974 रोजी आपण अग्रलेखाद्वारे केली होती. त्यानंतर या मागणीसाठी वकिलांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत बैठका घेऊन जनजागृती निर्माण केली. त्याचे फलित झाले आहे. आता फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढणार आहे; मात्र शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ती सुधारली पाहिजे. त्यासह वाहतुकीचे नियोजनही झाले पाहिजे. त्यासाठी पुढाकार घ्या. कोल्हापूर विमानतळावरील कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. शहरातील ब्ल्यू आणि रेड लाईन फेरआखणीबाबत बैठक घ्या. त्यानुसार विकासाला पोषक वातावरण निर्माण करा. ब्ल्यू लाईनच्या नावाखाली रखडलेल्या रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावा, अशा सूचनाही डॉ. जाधव यांनी यावेळी केल्या.
अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाला गती द्या
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासाचा पहिला आराखडा आपण तयार केला होता. नांदेडला गुर-द्दा-गद्दीच्या 300 व्या वर्षानिमित्त 2200 कोटींचा निधी केंद्र शासनाने दिला. यानंतर आपणही ज्या कंपनीने नांदेडचा आराखडा बनवला, त्याच कंपनीकडून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासाचा जिल्ह्याचा सर्वंकष असा आराखडा तयार करून तो सादर केला होता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला आहे. आता हा आराखडाही मंजूर झाला आहे, त्याला गती द्या, असे आवाहनही डॉ. जाधव यांनी केले.