कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी महायुतीच्या छ. शाहू शेतकरी विकास आघाडीची वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दुपारी घोषणा केली. उमेदवार निश्चित करण्यावरून घटक पक्षांमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत खलबते सुरू होते. शेवटपर्यंत उमेदवार निश्चित करताना नेत्यांची चांगलीच दमछाक झाली.
महायुती नेत्यांची बुधवारी शहरातील हॉटेल पॅव्हेलियन येथे बैठक झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ गुरुवारी सकाळी दहा वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून पॅनेलची घोषणा करतील, असे जाहीर केले होते.
मात्र, महायुतीच्या पॅनेलमध्ये गुरुवारी काही बदल झाल्याने गोंधळ उडाले. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जनसुराज्यमध्ये दुपारपर्यंत सुरू असलेल्या बैठकांच्या सत्रानंतर अडीच वाजता मंत्री मुश्रीफ यांनी पॅनेलची घोषणा केली.
आप्पाचीवाडी येथे घेतली शपथ
पॅनेलची घोषणा झाल्यानंतर जात महायुतीचे सर्व नेते, २५ उमेदवार यांनी कर्नाटकातील आप्पाचीवाडी येथे हालसिद्धनाथ मंदिरात निवडणुकीत एकत्र राहण्याची शपथ घेतली. कोणीही वैयक्तिक मताची मागणी करणार नाही, पॅनेल टू पॅनेल मतदान करण्याबाबतच प्रचार करायचा, अशीही शपथ घेतल्याचे समजते.
महायुतीचे पॅनेल असे :
सर्वसाधारण गट : माजी. आ. राजेश पाटील, अरुण डोंगळे, राहुल पाटील, रणजित पाटील, युवराज पाटील, सतीश पाटील (राष्ट्रवादी), रणजित पाटील (आ. यड्रावकर गट), अंबरिष घाटगे, डॉ. चेतन नरके, दीपक पाटील, प्रतापसिंह पाटील-कावणेकर, अशोक चराटी (भाजप), विश्वास पाटील, अजित नरके, संभाजी पाटील, अजित पाटील, वीरेंद्र मंडलिक, मदन देसाई (शिवसेना), अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड (जनसुराज्य).
महिला राखीव : शौमिका महाडिक (भाजप), अर्चना ए. वाय. पाटील (राष्ट्रवादी) इतर मागास : नवीद मुश्रीफ (राष्ट्रवादी) भटके विमुक्त : विश्वास जाधव (भाजप) अनुसूचित जाती : डॉ. सुजित मिणचेकर (शिवसेना)