Gokul Directors Meeting
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सत्तारूढ गटाच्या नेत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, कोल्हापुरातील गोकुळ कार्यालयात आज (दि.१५) होणाऱ्या बैठकीपूर्वी १९ संचालकांनी आपण सर्वजण एकत्र असल्याचा संदेश दिला आहे. बैठकीपूर्वी प्रशासकीय कार्यालयात सर्व संचालक एकत्र आले होते. मात्र, अरूण डोंगळे, आणि संचालिका शौमिका महाडिक अनुपस्थित होते. त्यामुळे सध्या तरी डोंगळे एकाकी पडल्याचे चित्र समोर आले आहे.
दरम्यान, गोकुळच्या संचालक मंडळाची आजची बैठक रद्द झाली आहे. सर्व संचालकांना आजची बैठक रद्द संदर्भातले निरोप देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. आजच्या बैठकीत गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे ठरल्याप्रमाणे राजीनामा देतील, असे सांगितले जात होते. मात्र डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
गोकुळवर सध्या मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची सत्ता आहे. अरुण डोंगळे यांना दोन वर्षांसाठी अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांची दोन वर्षांची मुदत आता संपली आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे त्यांना आजच्या बैठकीत राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. तत्पुर्वीच डोंगळे यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान, ‘राजीनामा देऊ नका’ अशा सुचना मुख्यमंत्र्यांकडून डोंगळे यांना देण्यात आल्याचे वृत्त पुढारी न्युजने दिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर डोंगळे भूमिका बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अरुण डोंगळे गोकुळच्या संचालकांच्या बैठकीला जाणार नसून राजीनामा देखील देणार नाहीत. यापूर्वी अदृष्ट चपला गोकुळमध्ये यायच्या, मात्र आता उघड आशा चपला येत असल्याचा अरुण डोंगळे यांनी आरोप केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली, त्यामध्ये महायुतीचा अध्यक्ष करण्यासंदर्भात एक मत झाले आहे. त्याचीच प्रक्रिया आता सुरू झालेली आहे, असे अरुण डोंगळे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर गोकुळमधील परिस्थिती बदलत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अरुण डोंगळे यांना अध्यक्षपदावर दोन वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यासाठी सांगितले होते. ठरल्याप्रमाणे आमचा विश्वास सार्थ ठरवून ते राजीनामा देतील, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.