शेखर पाटील : कोल्हापूर
Gokul General Assembly Shoumika Mahadik :
कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. अपेक्षेप्रमाणे या सभेत गोंधळ झालाच. या सभेवेळी गोकुळचे नवे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील देखील उपस्थित होते. या सभेत संचालिका शौमिका महाडिक काय बोलणार याच्याकडं सर्वांच लक्ष होतं. गोकुळच्या संचालिका म्हणून त्यांची स्टेजवर खुर्ची लावण्यात आली होती. मात्र त्यांनी खाली सभासदांमध्येच बसणं पसंत केलं. याद्वारे त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते.
शौमिका महाडिक यांनी सर्वसाधार सभा सुरू असताना विषय क्रमांक ९ ला विरोध दर्शवला. त्यांनी सभासद संख्या २१ वरून २५ वर नेण्याचं कारण काय हे सभासदांना सांगणं अपेक्षित आहे. मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळत नाहीये. ही निव्वळ राजकीय सोय आहे असा माझा त्यांच्यावर आरोप आहे असंही शौमिका महाडिक म्हणाल्या. मात्र शौमिका महाडिक बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर थोड्या वेळातच गोंधळ सुरू झाला. यावेळी शौमिका महाडिक यांनी प्रश्न विचारताच माईक बंद केल्याची तक्रार उपस्थित माध्यम प्रतिनिधींकडे केली.
यावेळी स्टेजवरून तुमच्या लोकांना गोंधळ बंद करायला सांगा असं सांगण्यात आलं. त्यावर शौमिका महाडिक यांनी कोणीही धक्काबुक्की केलेली नाही, कोणी घोषणाबाजी केलेली नाही. असं म्हणत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याची मागणी केली. यावेळी उत्तर मिळत नाही असं दिसल्यावर हा पळपुटेपणा आहे असे उद्गार देखील काढले. त्यांनी तुम्ही जे काल बोलत होता तेच आज रिपीट केलं असंही सांगितलं. मला माझ्या प्रश्नांची लेखी उत्तरे अजून पोहचली नाहीत असा आरोप देखील केला.
दरम्यान या गोंधळाच्या वातावरणातच गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी भविष्यात काय काय करणार याची घोषणा करण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी गोकुळ भविष्यात आईस्क्रीम आणि चीज बाजारात आणणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर नवी मुंबई शाखा वाशीसाठी मदर डेअरीची जागा खरेदी करणार असल्याची घोषणा देखील नवीद मुश्रीफ यांनी केली.
या जोडीला गोकुळ सीएनजी पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन देखील उभारणार आहे. तसंच वासरू संगोपन केंद्रामार्फत ५०० वासरे तयार करण्यात येणार आहेत. गोकुळ सिताफळ, अंजीर आणि गुलकंद बासुंदी देखील बाजारात आणणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.