

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये महायुतीचा अध्यक्ष असला तरी सत्ता कोणाची? याबाबत आपल्याच मनात संभ्रम आहे. महायुतीची सत्ता आहे, तर गोकुळच्या अहवालात महायुतीतील भाजप नेत्यांचे फोटो का नाहीत, असा सवाल संचालिका शौमिका महाडिक यांनी केला. गेल्या निवडणुकीत जे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, त्या सर्वांची उत्तरे माझ्याकडे आहेत. परंतु, आपल्या काही प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नसल्याचा टोलाही महाडिक यांनी आ. सतेज पाटील यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
पाच वर्षांतील टँकरचा खर्च हा पूर्वीपेक्षा वाढला आहे. दुधाच्या वासाबाबत मंत्री मुश्रीफ यांनीच मत व्यक्त केले आहे, असे सांगून महाडिक म्हणाल्या, दोन्ही दगडावर हात ठेवणे आम्हाला जमत नसल्याने पाच वर्ष विरोधातच राहण्याची मानसिकता केली होती. परंतु, राजकारण नेहमी बदलत असते. महायुतीचा अध्यक्ष झाल्याने आपण देखील संभ्रमात होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर युती धर्म पाळण्याचे आपण ठरविले. परंतु, आपण व्यासपीठावर बसलो तर त्यांच्या संपूर्ण कारभाराला आपला पाठिंबा आहे, असे होईल म्हणून आपण सभासदांसोबतच सभेत असणार आहे. मात्र, सभेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन आपण सभासदांना केले आहे.
‘गोकुळ’चे अध्यक्ष आपल्या माहेरचे असून भावाप्रमाणे आहेत. त्यांच्याबाबतीत आपली काही तक्रार नाही. त्यांनी प्रत्येक निर्णयामध्ये आपले मत घेतले आहे, असे महाडिक म्हणाल्या.
सध्या गाजत असलेली पावणेचार कोटींच्या घड्याळ, जाजम खरेदीबाबत विचारले असता शौमिका महाडिक यांनी या खरेदीचा विषय पत्रिकेवर कधी आलाच नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.