Hasan Mushrif
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या, अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली, File Photo
कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या

पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा :

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना शतकोत्तर सुवर्ण जयंतीचे औचित्य साधून मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा व त्यांच्या विचारांचा सन्मान करावा, अशी विनंती पंतप्रधान व केंद्रीय मंत्री यांना करत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या जन्मस्थळी अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना मुश्रीफ पुढे म्हणाले, शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला मी शुभेच्छा देतो. यानिमित्त येणाऱ्या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रारंभी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त सकाळी ८ वा. शाहू जन्मस्थळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह माजी नगरसेवक, श्रीराम सेवा संस्थेचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, राहुल पी. एन. पाटील यांनीही शाहू जन्मस्थळी भेट देऊन लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणा करत अभिवादन केले.

विविध राज्यांतून शाहू प्रेमींची उपस्थिती

कानपूर, उत्तर प्रदेशातील शाहू प्रेमींनी बुधवारी सकाळी जन्मस्थळी भेट देऊन अभिवादन करत शाहूंच्या कार्याची माहिती घेतली. शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान आणि चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला.

SCROLL FOR NEXT