Shahuwadi Mandur Farmers Injured
बांबवडे: शाहूवाडी तालुक्याच्या उत्तरेस असणाऱ्या शिराळे–वारुण परिसरातील पार्टेवाडी (ता. शाहूवाडी) येथे रानगव्याच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. ही घटना ताजी असतानाच मणदूर (ता. शिराळा) येथील उसाच्या फडात काम करणारे लक्ष्मण तातोबा माने (वय ४५) व बंडोपंत विष्णू पाटील (वय ४०) यांच्यावर गवा रेड्याने प्राणघातक हल्ला केला.
त्यांना तातडीने कराड येथे रूग्णालयात दाखल केले आहे. कालच्या जखमी वर तेथेच उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजी मारुती चिंचोलकर (वय ४५) आपल्या शेताकडे गेले असता, झुडपाआड दबा धरून उभ्या असलेल्या रानगव्याने अचानक त्यांच्यावर धडक दिली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. तसेच मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पार्टी वाडी च्या पलिकडील मणदूर येथे उसाच्या शेतात काम करणारे लक्ष्मण माने, बंडोपंत पाटील यांना गव्याने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
हा हल्ला अत्यंत प्राण घातक होता २४ तासात सलग दुसरा हल्ला. त्यामुळे या भागातील लोकांना वन्य प्राण्यांपासून धोका आहे. त्यामुळे सरकार याकडे लक्ष देईल का? असा सवाल निर्माण झाला आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या शाहूवाडी आणि शिराळा तालुक्यातील गावांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः रानगवे, बिबटे आणि अन्य हिंस्त्र प्राण्यांच्या मुक्त वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.