गणेशोत्सवात महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वी टोल माफी जाहीर केली आहे.  file photo
कोल्हापूर

गणेशोत्सवात महामार्गावर 'टोल फ्री' ची घोषणा : प्रशासन आदेशाच्या प्रतीक्षेत

Ganeshotsav 2024 | मुंबईहून कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांसाठी निर्णय

पुढारी वृत्तसेवा
राजकुमार बा. चौगुले

किणी : यंदाही गणपती सणासाठी पुण्या- मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वी टोल माफी जाहीर केली आहे. मात्र, अद्यापही टोल नाका प्रशासनास तशी कोणतीही सूचना मिळालेली नाही. (Ganeshotsav 2024)

एसटी बसेसना सवलत लागू होण्याची शक्यता

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणार्‍या भक्तांना गणेशोत्सव काळात गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही टोलमाफी देण्याची घोषणा केली आहे. कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणार्‍या गणेशभक्तांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत एसटी बसेसना ही लागू होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्‍या वाहनांची वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने महामार्गावरील यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Ganeshotsav 2024)

वाहनांवर लावण्यासाठी स्टिकर घ्यावे लागणार 

कोकणात जाणार्‍या वाहनांना ‘गणेशोत्सव-कोकण दर्शन’ या नावाचे स्टीकर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यापूर्वी टोल सवलतीचा हा कालावधी गणेशोत्सवापूर्वी जाताना तीन दिवस आणि गणेशोत्सवानंतर तीन दिवस असा सुमारे पंधरा दिवसांच्या कालावधीत लागू केल्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी स्थानिक पोलीस ठाणे व प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनांची नोंदणी करून त्यांच्याकडून वाहनांवर लावण्यासाठी स्टिकर घ्यावे लागत होते. पुण्याहून निघाल्यानंतर चिपळूणकडे जाणारी वाहने कराड पासून पाटण मार्गे रत्नागिरी, राजापूरला जाणारी वाहने किणी -वाठार वारणानगर- कोडोली मार्गे आंबा घाटातून.

'टोल फ्री'च्या सूचना टोल प्रशासनास नाही 

देवगड, कणकवलीला जाणारी वाहने कोल्हापूर, गगनबावडा मार्गे करूळ घाटातून तर कुडाळ मालवण सावंतवाडी, गोव्यास व कर्नाटकात जाणारी वाहने आजरा आंबोली मार्गे जात होती. यावर्षीही टोल फ्री सवलतीच्या काळात किणी (जि. कोल्हापूर) व तासवडे (जि. सातारा) यासह महामार्गावरील टोल नाक्यावरून सुमारे दहा हजारांहून अधिक पासधारक वाहने मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. मात्र, अवघ्या पाचसहा दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपला असतानाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून गणेश भक्तांना 'टोल फ्री' करण्याच्या कोणत्याही सूचना टोल प्रशासनास प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

महामार्गावरील टोल नाक्यांवर गणेशभक्तांना टोल सवलत देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा झाली आहे. परंतु, याबाबतच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आम्हाला मिळणे आवश्यक आहे. अशी सूचना मिळताच टोल सवलत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल.
- हर्षल शिंदे, व्यवस्थापक, किणी टोल नाका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT