[author title="राजेंद्र. दा. पाटील " image="http://"][/author]
कौलव: काँग्रेसचे दिवंगत नेते, आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांच्या निधनाच्या धक्क्याने त्यांचा इमानी कुत्रा 'ब्रुनो'ने व्याकुळ होऊन प्राण सोडले. ही मन हेलावणारी घटना मंगळवारी घडली. आमदार पी. एन. पाटील यांना पाय घसरून पडल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार चालू असतानाच गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे त्यांचे हजारो कार्यकर्ते अद्याप ही शोक मग्न आहेत. मात्र, पाटील यांच्या पाळीव कुत्र्यानेही धन्याच्या दर्शनाला पारखे झाल्यामुळे आपला प्राण सोडला.
स्वर्गीय पाटील यांच्या सुनबाई तेजस्विनी पाटील यांनी हा गोल्डन रिट्रीव्हर जातीचा कुत्रा माहेरहून आणला होता. त्याचे वय नऊ वर्षे होते. हा कुत्रा अतिशय आज्ञाधारक व कुटुंबाला लळा लावलेला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे त्याच्यावर जीवापाड प्रेम होते. आमदार पी. एन. पाटील यांचा पाय घसरून पडल्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल केल्यापासून ब्रुनोने अन्न पाणी सोडले होते. त्यांच्या मृत्यूनंतर तर त्याने बंगल्याच्या पाठीमागे लॉनवरून उठणेदेखील टाळले. त्याच्यावर औषध उपचार सुरू होते. अगदी सलाईन देऊन त्याचे प्राण वाचविण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न सुरू होते. अखेर मंगळवारी संध्याकाळी ब्रुनोने धन्याच्या विरहाने आपला प्राण त्याग केला.
ब्रुनोने आमदार पी.एन. यांना खुपच लळा लावला होता. ते खुर्चीत बसलेले असता ब्रूनो शेजारी येऊन बसत होता. एखादे वेळी ते रागावले, तर तो बाहेर जाऊन बसत होता. अगदी घरातील कोणीही हाक दिली, तर तो घरात येत नसे. मात्र, आमदार पाटील यांनी प्रेमाने हाक दिली की, तो अगदी पळत शेपटी हलवत त्यांच्या खुर्चीजवळ येऊन बसत होता.
मात्र, दररोज खुर्चीत बसणारा धनीच नसल्यामुळे ब्रुनोच्या जीवाची घालमेल झाली होती. अखेर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ब्रुनोने अखेरचा श्वास घेतला. आमदार पी. एन. हे आपल्या हिमालया एवढ्या उत्तम कर्तृत्वाने मृत्यूनंतर अजरामर झालेले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याचे पाणी अद्यापही तुटलेले नाही. अशातच त्यांच्या कुत्र्यानेही स्वामीनिष्ठेपोटी प्राण सोडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा