Shaktipith Highway Support Farmers Rally
कोल्हापूर : नागपूर - गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध सुरू झाला होता. परंतु हा विरोध काहीसा मावळ झाल्याचे दिसून येत आहे. या महामार्गाच्या समर्थनार्थ आज (दि.१९) शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपला महामार्गाला पाठिंबा असल्याचे निवेदन दिले. यावेळी शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार राजेश क्षीरसागर यांचे छायाचित्र असलेले फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.
यावेळी शेतकऱ्यांनी आपला शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा असल्याचे सांगून आपल्याला पाचपट आर्थिक मोबदला मिळावा, अशी मागणी केली. तर कोल्हापूरच्या विकासासाठी हा महामार्ग आवश्यक आहे, त्यामुळे आपला या महामार्गाला समर्थन असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपले सातबारे सोबत आणले होते.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग संदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीपीठ महामार्ग समर्थन समिती, कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आणि समर्थक शेतकरी बांधवांची आज बैठक होणार होती. या बैठकीला राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील हे सुद्धा आले होते.
स्वस्तिक पाटील हे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी आहेत. त्यामुळे ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मात्र, बैठक होणार नसून केवळ काहीजण समर्थनार्थ निवेदन देऊन जाणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.