जमावाचा उद्रेक अन् मुसलमानवाडीत दहशत File Photo
कोल्हापूर

Encroachment at Vishalgad| जमावाचा उद्रेक अन् मुसलमानवाडीत दहशत

विशाळगड अतिक्रमणाशी संबंध नसूनही आंदोलनाचा मोठा फटका; जमावापुढे पोलिस यंत्रणाही ठरली हतबल

पुढारी वृत्तसेवा

सुभाष पाटील

विशाळगड : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव आंदोलनाचा सर्वात जास्त फटका ज्यांचा अतिक्रमणाशी काहीच संबंध नाही अशा गजापूरपैकी मुसलमानवाडी येथील ग्रामस्थांना बसला. विशाळगड मुक्तीसाठी आलेल्या आंदोलकांनी विशाळगडऐवजी गजापूर येथील मुस्लीम वस्तीला टार्गेट केले.

रस्त्यातील दुकाने फोडल्यानंतर जमावाने मध्यवस्तीतील मशिदीत घुसून तोडफोड केली. शेजारील निवासगृहे व पार्किंगची मोडतोड करून दिसेल ते वाहन फोडत शेजारील ओढ्यात ढकलली.

जमावाच्या या उद्रेकाने वस्तीत प्रचंड दहशत माजली. अनेकजण घरे सोडून पळून गेले. हल्ल्यात सात मोठी वाहने, तर तीन मोटारसायकली फोडलेल्या दिसल्या. एका दुकानातील सिलिंडर पेटवून दुकान पेटवून दिले.

जमावापुढे पोलिस यंत्रणा हतबल ठरली. अतिक्रमणे विशाळगडावर झाली; पण आंदोलकांच्या रोषाला गजापूरकरपैकी मुसलमानवाडी ग्रामस्थांना सामोरे जावे लागले.

मुसलमानवाडी विशाळगड रस्त्यालगत असल्याने सर्वात जास्त फटका रस्त्यालगतच्या घरांना बसला. रस्त्याकडील चिकन, शितपेयाची दुकाने उद्ध्वस्त केली. काहींनी घर सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला, तर काहींनी शनिवारीच शेजारी गावातील नातेवाईकांकडे धाव घेतली होती.

वड्याचे तेल वांग्यावर...!

गडापासून पूर्वेला अडीच किलोमीटर अंतरावर मुसलमानवाडी आहे. या वस्तीतील लोकांचाही गडावरील अनधिकृत अतिक्रमणाला विरोध होता. गडावरील स्वच्छता, दुर्गंधी आणि बेकायदेशीर अतिक्रमणामुळे गडाचे पावित्र्य जपले जात नसल्याच्या प्रतिक्रिया येथील नागरिकांतून केल्या जात होत्या. ऐतिहासिक गड आहे म्हणून आमची रोजीरोटी चालते, घरसंसार चालतो. त्यामुळे गड वाचवायलाच हवा, असे येथील रहिवाशांचे मत होते; मात्र आज झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे वड्याचे तेल वांग्यावर, अशी परिस्थिती निर्माण झाली.

आंदोलक इतके हिंसक बनले की, गडाच्या रस्त्यालगत असणाऱ्या ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला. घरातील महिला सैरावैरा दिसेल त्या दिशेने पळू लागल्या. आंदोलक घरात शिरून नासधूस करत होते. घराच्या काचा, वाहने, पत्रे, जाळपोळ आदींनी नागरिक भयभीत झालेत. आमचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला.
- इमाम प्रभुळकर, गजापूर-मुसलमानवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT