कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अतिक्रमणे हटविण्यावरून महापालिकेचे नाक टोचल्यानंतर सोमवारी महापालिकेने धडक कारवाई करत 12 दुकानगाळे उद्ध्वस्त केले होते. या कारवाईचा धसका अतिक्रमणधारकांनी घेतला आहे. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात अतिक्रमण निर्मूलन पथक पोहोचताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील काही अतिक्रमणधारकांनी स्वत:हूनच अतिक्रमणे काढायला सुरुवात केली. यावेळी महापालिकेच्या पथकाने जिल्हाधिकारी चौकातील फळ विक्रेते, भाजी विक्रेत्यांसह 13 हातगाड्या व डिजिटल फलकही हटविले.
कोल्हापूर शहराला अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. शहरातील या अतिक्रमणांचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये उपस्थित होताच, फुटपाथ मोकळे करा, असा आदेश न्यायालयाने दिला. त्यानंतर महापालिकेची यंत्रणा चांगलीच कामाला लागली. सोमवारी चिमासाहेब चौक ते ट्रॅफिक ऑफिसदरम्यानच्या अनधिकृत 12 दुकानगाळ्यांवर कारवाई करत दुकानगाळे उद्ध्वस्त करण्यात आले.
त्यानंतर मंगळवारी सलग दुसर्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात अतिक्रमण निर्मूलन पथक गेले. या पथकाने येथे कारवाई करायला सुरुवात करताच आजूबाजूचे काही अतिक्रमणधारक आले. विशेषत:, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणार्या काही दुकानगाळ्यांच्या समोरील शेड काढून घ्यायला सुरुवात केली; तर दुसर्या बाजूला पथकाने अनधिकृत व बेकायदेशीर विनापरवाना शेड, हातगाड्या व अनधिकृत डिजिटल बोर्डवर कारवाई केली.
ही कारवाई प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त जयंत जावडेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणाखाली उपशहर अभियंता अरुण गुर्जर, अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहायक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, रवींद्र कांबळे आदींनी केली.
यापुढेही कारवाई सुरूच राहणार
विभागीय कार्यालय क्र. 3 राजारामपुरी व अतिक्रमण निर्मूलन पथकांतर्गत खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय रोड ते सर्किट हाऊस व यल्लम्मा मंदिर चौक येथील 11 विनापरवाना शेड, 13 हातगाड्या व 7 अनधिकृत डिजिटल बोर्डवर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई महापालिकेच्या वतीने येथून पुढेही सुरू राहणार असून, अशा प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात येणार आहे.