Farmer Killed by Gaur Radhanagari
धामोड: राधानगरी तालुक्यातील पाल खुर्द येथे राहीचे वावर नावाच्या शेतात गव्याने धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाला. शामराव कोंडीबा कोराणे (वय ७०, रा. पाल खुर्द) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.११) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शामराव कोराणे यांच्या शेता शेजारीच गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी आहे. ते आपल्या काजूच्या बागेच्या राखणीसाठी गेले होते. त्यावेळी बसलेल्या स्थितीतच गव्याने त्यांना जोराची धडक दिली. गव्याने शिंग मारल्याने यात त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. शेतात काम करणाऱ्या आसपासच्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने गवा तिथून निघून गेला.
दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा वन विभागाने केलेला आहे. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली आहे. घटनेची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे, परिक्षेत्र वन अधिकारी विशाल पाटील, सीपीआरमध्ये दाखल झाले होते. या घटनेमुळे पाल खुर्द गावात हळहळ व्यक्त होत आहे.