नृसिंहवाडीत व्यापारी पेठमध्ये घुसलेले पाणी Pudhari Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : महापुरामुळे नृसिंहवाडीत व्यापारी पेठ ठप्प

पुढारी वृत्तसेवा

विनोद पुजारी : नृसिंहवाडी

शिरोळ तालुक्यात उद्भवलेल्या पूरसदृश स्थितीमुळे नृसिंहवाडीतील व्यापारी पेठ ठप्प झाली आहे. यामुळे लाखो रुपयांच्या मिठाईची उलाढाल थांबली असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाण्याचा विळखा व्यापारी पेठेतील दुकानांना बसला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाने सर्व साहित्य सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

यामुळे दुकानदारांवर मिठाई, पेढे असे साहित्य विना मोबदला देण्याची वेळ आली आहे. मुख्य मंदिराच्या परिसरात मेवामिठाईची सुमारे तीसहून अधिक दुकाने आहेत. महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, गुजरात, आंध्र, गोवा आदी राज्यातून लाखो भाविक वर्षभरात भेटी देतात. 'वाडीचा पेढा', 'वाडीची बासुंदी' अशी विशेष ओळख अनेक पदार्थांना मिळाली आहे. महापुराच्या स्थितीमुळे हे सारं वैभव एका क्षणात हिरावलं गेलं आहे. काही दुकानांमध्ये ३-४ फूट पाणी आहे. पुराचे पाणी उतरल्यानंतर रोगराई, स्वच्छतेचा प्रश्न उद्भवणार असल्याने व्यापारी वर्ग चिंताग्रस्त आहे. परिस्थिती पूर्ववत होण्यास अंदाजे एक महिन्याचा कालावधी लागणार असून नृसिंहवाडीची व्यापारी पेठ पुन्हा कधी गजबजणार? असा प्रश्न भाविकांना पडला आहे.

कराड, सांगली, कोल्हापूर या भागात पाणी काही इंचांनी उतरल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र नृसिंहवाडीत याउलट परिस्थिती असून पाणी दररोज काही इंचांनी वाढते आहे. गेल्या चोवीस तासांत अर्ध्या फुटाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पाण्याची पातळी संथ गतीने उतरण्याची शक्यता येत्या दोन दिवसांत असली तरीही गावातील शेकडो कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.

नृसिंहवाडी : येथील नेहमी गजबजलेली असणारी व्यापारी पेठ आता सुनी-सुनी वाटत आहे. (छाया - दर्शन वडेर, नृसिंहवाडी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT