गणेशोत्सवाच्या धामधुमीत 15.51 लाखांचे ड्रग्ज जप्त File Photo
कोल्हापूर

गणेशोत्सवाच्या धामधुमीत 15.51 लाखांचे ड्रग्ज जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरसह जिल्ह्यात अमली पदार्थांची खुलेआम तस्करी करणारा कुख्यात तस्कर मनीष रामविलास नागौरी (वय 35, रा. सांगली नाका, इचलकरंजी) याच्यासह पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार समीर ऊर्फ साजन ऊर्फ पाबलो गुलाब शेख (31, सध्या रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर, मूळ गाव बारामती, पुणे)

याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शनिवारी पहाटे बेड्या ठोकल्या. संशयितांकडून 15 लाख 51 हजार रुपये किमतीचा 12 ग्रॅम एमडी ड्रग्जसाठा हस्तगत करण्यात आला आहे. करवीर तालुक्यातील मोरेवाडी व वाशी नाका-पिरवाडीजवळ पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. अमली पदार्थ तस्करीतील म्होरक्या पोलिसांच्या हाताला लागल्याने तस्करी उलाढालीतील सराईतांचे धाबे दणाणले आहे. तस्करांच्या चौकशीत निष्पन्न होणार्‍या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोल्हापूर, इचलकरंजीसह सीमाभागात वरिष्ठस्तरावर छापासत्र सुरू केले आहे. नागौरीसह साथीदार समीर शेख कोणाच्या संपर्कात आहे, याचीही माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

नागौरीविरुद्ध कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात शस्त्र, अमली पदार्थ तस्करीसह फसवणुकीचे 22 पेक्षा अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे; तर समीर शेख याच्यावर पुणे, बारामती येथील पोलिस ठाण्यांत 8 पेक्षा जादा गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. न्यायालयाने दोघांनाही 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव धामधुमीत एमडी ड्रग्ज तस्करीची मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू असल्याची स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी कोल्हापूर, इचलकरंजीसह सांगली, मिरजेतही तस्करी टोळीचा शोध घेतला. सीमाभागातही दोन दिवसांपासून पथके कार्यरत होती, तस्करांचा सुगावा लागत नव्हता.

पुण्यातील कुख्यात तस्करांचे कोल्हापुरात वास्तव्य!

पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार समीर शेख याने कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटीलनगरात आश्रय घेतल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यास वाशी नाका-पिरवाडीजवळ मोटारीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे 12 ग्रॅम एमडी ड्रग्ज व मोटार कार आढळून आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये हस्तगत केलेल्या ड्रग्जची 15 लाखांवर किंमत असल्याचे रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

इचलकरंजीसह परिसरात छापेमारी; मात्र सापडला मोरेवाडीत

समीर शेख याच्या चौकशीतून इचलकरंजी येथील मनीष नागौरी याचे नाव निष्पन्न झाले. पथकाने इचलकरंजीसह परिसरात रात्रभर छापेमारी केली; पण त्याचा थांगपत्ता लागला नाही. विश्वसनीय सूत्राकडून मनीष नागौरी हा मोरेवाडी (ता. करवीर) परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने शनिवारी पहाटे छापा टाकून त्यास ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वत: दोन्हीही कुख्यात तस्करांकडे चौकशी केली. एमडी ड्रग्ज कोठून आणि कोणासाठी मागविले, याची माहिती घेण्यात येत आहे. अमली पदार्थ तस्करीत कोल्हापूर जिल्ह्यात मोठे रॅकेट कार्यरत असावे, असा पोलिस अधीक्षक पंडित यांना संशय आहे. तस्करी टोळीची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिले आहेत. कुख्यात तस्करी टोळ्यांच्या म्होरक्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह सहायक निरीक्षक चेतन मसुटगे, जालिंदर जाधव, महेश गवळी, अशोक पवार, अमित सर्जे, संतोष बर्गे, वैभव पाटील, नामदेव यादव आदींनी प्रयत्न केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT