कोल्हापूर

डॉ. आर. व्ही. पोवार यांचे युपीएससी परीक्षेमध्ये यश; केंद्रात वरिष्ठ कृषी अभियंतापदी निवड

करण शिंदे

किणी, पुढारी वृत्तसेवा : डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय तळसंदेचे येथील माजी विद्यार्थी डॉ. आर. व्ही. पोवार यांची केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात वरिष्ठ कृषी अभियंतापदी निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून निवड करण्यात झालेली आहे. निवड झालेल्या 7 अभियंत्यामध्ये सर्वात कमी वयात हे यश मिळवण्याचा मान डॉ. पोवार यांना मिळाला आहे.

सदर परीक्षेतून निवडले जाणारे उमेदवार देशाच्या कृषी संशोधन आणि विकासासाठी महत्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉ. आर. व्ही. पोवार यांनी डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे येथून बी. टेक. ॲग्री. पदवी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथून एम. टेक. ॲग्री हे पदव्युत्तर शिक्षण व डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून सुर्वण पदकासह पीएचडी प्राप्त केली. ते सध्या डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय तळसंदे महाविद्यालयात कृषी अवजारे आणि शक्ती विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. पोवार यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रांना दिले. तसेच डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्री महाविद्यालय येथील विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व व्यवस्थापनाचा अनुभव खूप उपयोगी पडला. कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे चांगले यश मिळवता आले. यापुढे कृषी अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीत नवनवीन संशोधन करून भारतीय कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देण्याचा मानस असल्याचे डॉ. पोवार यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. एस. बी पाटील म्हणाले, डॉ. पोवार यांनी युपीएससी परीक्षेत मिळवलेले यश महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा दाखला आहे. त्यांचे हे यश महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तसेच बी. टेक. ॲग्री साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल." संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी डॉ. पोवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT