कोल्हापूर / बिद्री : पुढारी वृत्तसेवा
अटी व शर्तीचे पालन न केल्याच्या कारणावरून बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी निलंबित केला. अधिकार्यांनी डिस्टिलरी प्रकल्पातील टाक्यांमध्ये असलेले 10 लाख लिटर स्पिरिट जप्त केले. ही कारवाई उत्पादन शुल्कच्या कागल विभागाच्या पथकाने केली.
शुक्रवारी रात्री (दि. 21) कारखान्यातील डिस्टिलरीची तपासणी केल्यानंतर खळबळ माजली होती. दरम्यान, सोमवारी डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना निलंबित करण्यात आला. यानंतर कारखाना परिसर व राधानगरी विधानसभा मतदारसंघात उलटसुलट चर्चांना उधाण आले.
कारखान्याचा सुमारे 130 कोटी रुपयांचा डिस्टिलरी प्रकल्प आहे. काम पूर्ण होऊन त्याची उत्पादन चाचणी सुरू आहे. प्रकल्पातून दहा लाखापेक्षा जास्त लिटर स्पिरिट उत्पादन झाले आहे. मात्र कारखान्याने उत्पादन शुल्क विभागाच्या काही अटी व शर्ती पाळल्या नाहीत, असा संशय उत्पादन शुल्क खात्याला आहे. त्यामुळे पुणे येथील पथकाने शुक्रवारी प्रकल्पस्थळी तपासणी केली. रात्रभर केलेल्या तपासणीत अधिकार्यांनी माहिती संकलित केल्याची शक्यता आहे. पथकाने वरिष्ठांना अहवाल सादर केल्यानंतर विभागाच्या आयुक्तांनी सोमवारी आदेश काढून डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना निलंबित केला. हा आदेश घेऊन कोल्हापूर कार्यालयातील दोन अधिकारी व चार कर्मचारी असे सहा अधिकार्यांचे पथक सायंकाळी साडेसात वाजता कारखान्यावर गेले. त्यांनी आदेशाची प्रत कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांना देण्यासाठी कारखान्याच्या अधिकार्यांकडे सादर केली. त्यानंतर पथकातील अधिकार्यांनी प्रकल्पाच्या जागेचा पंचनामा केला. प्रकल्पस्थळावरील तीन टाक्यांमध्ये सुमारे 10 लाखावर लिटर स्पिरिट आहे. या टाक्यांना कुलपे लावून ते जप्त करण्यात आले आहे.