Dhananjay mahadik Satej Patil Condolence: पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर राजकीय मतभेद बाजूला ठेवत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी धनंजय महाडिक यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अरूंधती महाडिक देखील होत्या.
खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांची मैत्री एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत होती. मात्र, २०१२ नंतर दोघांमध्ये राजकीय वैर निर्माण झालं आणि त्यानंतर अनेकदा व्यासपीठावर आणि राजकारणात दोघांनीही एकमेकांविरोधात टोकाची भूमिका घेतली.
मात्र, डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर हे राजकीय मतभेद बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिक यांनी पत्नी अरुंधती महाडिक यांच्यासह कसबा बावडा येथील आमदार सतेज पाटील आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी धनंजय महाडिक यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्याला खचून न जाता पुढे यश मिळेल, असा सल्ला दिला होता, अशी आठवण महाडिक यांनी सांगितली.
‘लोकसभेत पराभव झाला म्हणून खचून जाऊ नकोस, पुढे यश नक्की मिळेल,’ असा सल्ला त्यांनी दिला होता आणि त्यानंतर २०१४ मध्ये आपण खासदार झालो, असंही धनंजय महाडिक यांनी यावेळी सांगितलं. तसंच, डॉ. डी. वाय. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र आमदार सतेज पाटील आणि संजय पाटील हे कर्तृत्ववान असल्याचाही उल्लेख खासदार धनंजय महाडिक यांनी केला.