पुढारी ऑनलाईन डेस्क : ५० हून अधिक वर्षे सत्ता असणाऱ्या विरोधकांना सदाभाऊ खोत यांनी प्रश्न करत आजवर कोणत्याही नेत्याने मराठा समाजासाठी केले नाही, ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा विद्यार्थ्यांसाठी सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम केले. जलयुक्त शिवार योजना, कापूस, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न फडणवीस यांनी केले, असे माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
पुढारी NEWS' च्या 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आयोजित कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत यांनी आज (दि.१३) संवाद साधला. यावेळी पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणारे फडणवीस नेते आहेत. त्यांच्या सत्तेच्या काळात खूप मोर्चे काढण्यात आले. परंतु त्यांनी मराठा आंदोलन चांगल्या प्रकारे हाताळले. फडणवीस यांनी लहान माणसे जवळ केली. त्यामुळे आमची सारखी माणसे आमदार, मंत्री झाले. नाहीतर आम्हाला कोणी मंत्री, आमदार केले असते का? फडणवीस यांनी फार्मर कंपन्या काढल्या. जलयुक्त शिवार योजना ग्रामीण भागासाठी वरदान ठरली.
शेतकरी कष्ट करतो म्हणून लोकांच्या ताटात जेवण पडते. ८० कोटी लोक फुकट जेवतात. पण त्यांच्यासाठी अन्न धान्य कोण पिकवणार ? असा सवाल करून सगळे फुकट वाटणे धोकादायक आहे. शेतकऱ्यांचे चित्र विदारक आहे. सत्तेसाठी काय वाटायचे तर या शेतकऱ्यांसाठी वाटले पाहिजे. शेतकरी सन्मानासाठी शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.