इचलकरंजी : गांजा, मावा, मेफेड्रॉन यांसारख्या झिंग आणणार्या नशेत इचलकरंजीतील तरुणाई गुरफटली आहे. नशेची सवय लागल्याने अनेक तरुण नकळतपणे गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी कारवाई केली आहे; मात्र कारवाईतील सातत्याचा अभाव आणि पोलिसी खाक्याचा कमी झालेला धाक यामुळे आजही नशेचा बाजार खुलेआमपणे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नशेचा बाजार उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
वस्त्रनगरीत विविध राज्यांतील नागरिक रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. त्यामुळे कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, राजस्थान या ठिकाणाहून नागरिकांची ये-जा नेहमीच सुरू असते. व्यवसाय, रोजगाराच्या निमित्ताने वेगवेगळे लोक शहराशी जोडले गेले आहेत. त्यामुळे अवैध व्यवसायावर नियंत्रण राहिलेले नाही. नशेचे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्यामुळे तरुणाई दिवसेंदिवस गुरफटत चालली आहे. गांजा, मावा, गुटखा यासह आता मेफेड्रॉन आणि मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन अशा महागड्या नशिल्या पदार्थांची सहज उपलब्धता शहरात होत आहे.
नशेची ठराविक ठिकाणे असल्यामुळे याठिकाणी नशिले पदार्थ सहज उपलब्ध होतात. यासाठी ग्राहक वर्गही ठरलेला आहे. याठिकाणी अनोळखी ग्राहकाला सहजासहजी प्रवेश मिळत नाही. नियमित ग्राहकाला ही सेवा अखंड मिळत असल्यामुळे यातून नशेचा काळाबाजारही फोफावला आहे. बंद पाकिटातून ग्राहकांना नशिले पदार्थ सहज उपलब्ध होत असल्यामुळे विनासायास तरुण यामध्ये दिवसेंदिवस गुरफटत चालले आहेत. गुटखा, मावा आदींवर बंदी असली तरी ठराविक ठिकाणी याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. त्याठिकाणी खवय्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र, यंत्रणेपासून ते चार हात लांब असतात. त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्यामुळे दिवसेंदिवस त्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
पोलिसांनी काही दिवसांत नशिल्या पदार्थांच्या विक्री विरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यातून त्यांनी नशिल्या पदार्थांचा बाजार नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यामध्ये सातत्य नसल्यामुळे आणि विक्रेते पर्यायी मार्ग अवलंबत असल्यामुळे समूळ उच्चाटन करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी विशेष पथकांची नेमणूक करून नशिल्या पदार्थांचा बाजार उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ड्रग्ज आणि प्रतिबंधक इंजेक्शनच्या तपासात पोलिसांच्या हाती अभियांत्रिकी तरुण लागला. तपासात त्याचे दिल्ली कनेक्शनही उघड झाले. त्यामुळे ड्रग्ज विक्रीतील परराज्यातील कनेक्शन पोलिसांसमोर आले आहे; मात्र पोलिसांना तपासात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी मूळ विक्रेते आणि ग्राहक यांचा शोध घेतानाही पोलिसांवर मर्यादा आल्या आहेत. ड्रग्ज घेणारे ग्राहकही सधन कुटुंबातील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेही तपासावर मर्यादा येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.