कोल्हापूर : प्रचाराचा धडाका सुरू झाला. उमेदवारांना बुधवारी (दि. 26) चिन्ह मिळणार आहे. यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी केवळ चारच दिवस मिळणार आहेत. यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांसह नेत्यांनाही पायाला भिंगरी बांधावी लागणार आहे. उमेदवारांसह स्थानिक आणि जिल्हा पातळीवरील नेते आणि राज्याचेही नेते प्रचारात रंग भरणार आहेत.
रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातकणंगले येथे रोड शोने शिवसेनेचा जिल्ह्यातील प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी सायंकाळपासूनच प्रचाराला सुरुवात झाली. शनिवारी सकाळपासूनच उमेदवारांनी मतदारांच्या गाठी-भेटीवर भर दिला. काहींनी मतदार संघातून प्रचार फेरीही काढली.
अद्याप चिन्ह नसले तरी उमेदवारांनी प्रचार पत्रके, होर्डिंग्ज, चित्रफिती आदींची तयारी सुरू केली आहे. बुधवारी चिन्ह मिळताच दुपारपासूनच चिन्हासह प्रचार साहित्य उपलब्ध होईल, यादृष्टीने बहुतांशी उमेदवारांनी तयारी केली आहे. सध्या मात्र चिन्हाविना उमेदवारांचा प्रचार सुरू असून वैयक्तिक संपर्कावर जादा भर दिला जात आहे.
प्रत्येक मतदारापर्यंत, प्रत्येक घरात आपले चिन्ह पोहोचावे यासाठी उमेदवारांकडून विविध फंडे आजमावले जाणार आहेत. त्याचेही नियोजन सुरू झाले आहे. पक्षांसह स्थानिक आघाड्या, गट-तटांसह उमेदवारांचीही संपर्क कार्यालये सुरू होऊ लागली आहेत. प्रचारासाठी मिळणारा वेळ, प्रभागाचे क्षेत्र, जिल्हा, राज्य पातळीवरील नेत्यांचे नियोजन या सर्वांचा विचार करून प्रचाराची रणनीती ठरवली जात आहे. जाहीर सभा, कोपरा सभा, रोड शो आदींसह चाय पे चर्चा, मिसळ पे चर्चा, माहितीपट, रिल्स, मुक्त संवाद अशा विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले जात आहे.