

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची मतदारयादी आता औपचारिकरीत्या जाहीर झाली असून, निवडणूक प्रक्रियेला निर्णायक वेग मिळाला आहे. गुरुवारी घोषित झालेल्या प्रारूप यादीत एकूण 4 लाख 94 हजार 711 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये 2 लाख 44 हजार 734 पुरुष, 2 लाख 49 हजार 940 महिला तर इतर 37 मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा पाच हजारांनी जास्त आहे. मतदारयादीचे प्रारूप जाहीर झाल्याची माहिती प्रशासक के.मंजुलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, मतदारयाद्या घेण्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातून गर्दी झाली होती.
ही मतदारयादी जुलै 2025 मध्ये झालेल्या विधानसभेच्या यादीवर आधारित आहे. इच्छुक मतदारांना 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची संधी देण्यात आली असून, 5 डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर मतदारयादीही समोर आल्यामुळे पूर्वतयारी जवळपास पूर्णत्वास पोहोचली आहे.
कोल्हापूर महापालिका क्षेत्रात कोल्हापूर उत्तर व दक्षिण असे दोन्ही विधानसभा मतदारसंघ येतात. काही प्रभागांत या दोन्ही मतदारसंघांतील मतदारांचा समावेश असल्याने महापालिका निवडणुकीचा प्रभाव विधानसभेलाही जाणवणार आहे. प्रभागांतील मतदारसंख्येचा आढावा घेतला असता, प्रभाग-3 मध्ये सर्वात कमी 20,106 मतदार, तर प्रभाग-20 मध्ये सर्वाधिक 32,615 मतदार असल्याचे स्पष्ट झाले. प्रभाग-3 हा चार सदस्यीय, तर प्रभाग-20 हा पाच सदस्यीय असल्याने या दोन प्रभागांकडे विशेष लक्ष असेल.
मतदारयादी पाहण्यासाठी महापालिकेने विभागीय कार्यालयांमध्ये सोयी केल्या आहेत. प्रभाग 1, 10, 11, 19 व 20 चे मतदार गांधी मैदान येथील विभागीय कार्यालय क्रमांक 1 येथे तर प्रभाग 6, 7, 8 व 12 चे मतदार शिवाजी मार्केटमधील कार्यालय क्रमांक 2 येथे यादी पाहू शकतात. प्रभाग 13 ते 18 साठी बागल मार्केट, राजारामपुरी (कार्यालय क्रमांक 3) तर प्रभाग 2 ते 5 साठी संबंधित कार्यालयातच हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजला असून, मतदार, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ आता आणखी वाढणार आहे.