Shahuwadi Taluka renaming
विशाळगड : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्श कार्याचा वारसा जपणारा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका लवकरच 'शाहूगड' या नव्या नावाने ओळखला जाण्याची शक्यता आहे. या तालुक्याचे नाव बदलून 'शाहूगड' करण्यात यावे, यासाठी शेतकरी नेते आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे आग्रही मागणी केली आहे.
या मागणीचा पाठपुरावा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आणि तहसीलदार लव्हे यांच्यामार्फतही मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आला आहे
शाहूवाडी तालुक्यातील जनतेकडून 'शाहूगड' नामकरणाची मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत होती. या मागणीला मूर्त स्वरूप देण्यासाठी आबासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन हा पत्रव्यवहार केला आहे. ऐतिहासिक परंपरेचा आणि राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्श कार्याचा वारसा जपणारा हा प्रदेश आहे. शाहू महाराजांचे सामाजिक न्याय, शिक्षण आणि सर्वसमावेशक विकासाचे विचार आजही येथे जपले जातात, त्यामुळे या तालुक्याला महाराजांच्या नावाशी सुसंगत 'शाहूगड' हे नाव मिळावे, अशी जनतेची तीव्र भावना आहे.
निवेदनात 'शाहूगड' नामांतरासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि भावनिक मुद्दे मांडण्यात आले आहेत. हा तालुका केवळ शाहू महाराजांच्या वास्तव्याने पावन झाला आहे असे नाही, तर याच भूमीत 'विशाळगड' सारखा ऐतिहासिक गडकोट आणि बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेली 'पावनखिंड' देखील आहे.
आबासाहेब पाटील यांच्या मते, "शाहूगड" हे नाव ऐतिहासिक वारसा आणि भौगोलिक वैशिष्ट्यांना पूर्णपणे सुसंगत आहे. तसेच, हे नामांतर शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव अधिक ठळकपणे व्यक्त करेल आणि तालुक्याला एक स्पष्ट, वैशिष्ट्यपूर्ण व अभिमानास्पद ओळख मिळवून देईल.
तालुक्याच्या जनतेमध्ये या नावाबद्दल असलेली भावनिक व सांस्कृतिक नाळ लक्षात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. या महत्त्वपूर्ण मागणीवर हिवाळी अधिवेशनात त्वरित निर्णय घेऊन 'शाहूगड' नामाभिषेक करावा, अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे. हा निर्णय एक 'स्वराज्याची ओळख' निर्माण करणारा ऐतिहासिक निर्णय ठरेल, असे पाटील यांनी नमूद केले आहे.
तालुक्याचे नामांतर 'शाहूगड' व्हावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. स्वराज्याची ओळख निर्माण करणारा ऐतिहासिक निर्णय झाल्यास 'शाहूगड' हे सुवर्ण अक्षरांमध्ये कायमस्वरूपी लिहिले जाईल. तालुक्यातील जनतेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन हिवाळी अधिवेशनात हा महत्वपूर्ण निर्णय होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.- आबासाहेब पाटील, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य