नृसिंहवाडी : दर्शन वडेर
'दिगंबरा दिगंबरा..' च्या जयघोषात असंख्य दत्तभक्तांनी नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरातील दक्षिणद्वार सोहळ्यात तीर्थस्नानाची अनुभूती घेतली. पहाटे साडेतीन वाजता श्रींच्या पादुकांवरून कृष्णेचे पाणी प्रवाहित होऊन चालू वर्षातील पहिला 'दक्षिणद्वार सोहळा' भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पहाटेपासूनच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी या अद्भुत पर्वणीचा लाभ घेतला.
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा पंचगंगा नदीखोऱ्यात पावसाची संततधार सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या पाण्यामुळे कृष्णेचे पाणी काल मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे हा नयनरम्य सोहळा कधी अनुभवता येईल, याकडे सर्व दत्तभक्तांचे लक्ष लागले होते.
अखेर मंगळवारी पहाटे कृष्णा नदीच्या पाण्याने मंदिराच्या उत्तर द्वारातून आत प्रवेश केला आणि थेट श्रींच्या पवित्र पादुकांवर प्रवाहित होत जलाभिषेक केला. कृष्णेचे पाणी दक्षिणद्वारातून बाहेर पडते म्हणून याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. या विलोभनीय आणि दैवी क्षणामुळे राज्यभरातील दत्तभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णामाईने श्रींच्या पादुकांना प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा हा प्रसंग दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानला जातो. वर्षातून केवळ पावसाळ्यातच ही मोठी पर्वणी भक्तांना अनुभवायला मिळते. दत्त देवस्थान प्रशासनाने सर्व साहित्य सुरक्षितस्थळी स्थलांतर करून खबरदारी घेतली आहे. दरम्यान, धरण क्षेत्र आणि परिसरात पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
श्री दत्त मंदिराला कृष्णेच्या पाण्याने वेढा दिल्या असल्याने श्रींची उत्सवमूर्ती नारायण स्वामी मठात ठेवण्यात आली आहे. येथे भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून सर्व पूजेचे नित्यक्रम येथे सुरू राहतील असे दत्त देवस्थानचे अध्यक्ष प्रा. गुंडो पुजारी यांनी सांगितले.