डॉ. योगेश जाधव, समूह संपादक, पुढारी
महाराष्ट्राच्या प्रश्नांची नेमकी जाण, कार्यकर्त्यांचे मोठे मोहोळ असणारा आणि जनमानसावर राज्य करणारा लोकनेता अजितदादांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला. माझी आणि अजितदादांची मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या कक्षात भेट व अर्धा तास दिलखुलास गप्पा होऊन अवघे 24 तासही झाले नाहीत आणि ही दुर्दैवी घटना कानावर आली आणि मन सुन्न झालं...
महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होती. बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री कक्षात मी थांबलेलो असताना बैठक संपवून तिथं अजितदादा आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अन्य काही बैठका सुरू असल्याने जवळपास अर्धा तास आम्हाला निवांत गप्पा मारता आल्या. जिल्हा परिषद प्रचारासाठी सज्ज झालेले अजितदादा एकदम जॉली मूडमध्ये होते. अजितदादा जसे प्रसंगावधानी, तसेच ससंदर्भ बोलणारे. ‘पुढारी’चा आवर्जून उल्लेख करत, ‘येणार्या झेडपी निवडणुका या तुमच्या व माझ्याही प्रभाव क्षेत्रातल्या आहेत आणि तिथं आमचा पक्ष चांगली कामगिरी करेल,’ असे सांगताना पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा फीडबॅकही त्यांनी घेतला. महाराष्ट्राच्या विकासासाठी, बेरोजगारी दूर करण्यासाठी राज्यात ‘इन्फ्रा प्रोजेक्ट’ कसे महत्त्वाचे आहेत, ‘लाडकी बहीण’ योजना कशी सुरू राहणार आहे, अशा अनेक गोष्टींवर दादा मोकळेपणाने बोलत होते. राज्याच्या येत्या अर्थसंकल्पाची तयारी करत असून, पुढचे काही दिवस मी त्यासाठीच ठाण मांडून बसणार आहे, असेही दादा म्हणाले होते.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात झालेल्या पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमाची आठवण त्यांनी काढली. मा. साहेबांची त्यांनी जिव्हाळ्याने चौकशी केली आणि मा. जाधव साहेबांना निवांत भेटायला कोल्हापूरला येतो, असे त्यांनी आवर्जून मला सांगितले. अजितदादांचा हसतमुख आणि बोलका चेहरा, आम्ही गप्पा मारत असताना येणार्या-जाणार्या आमदारांना त्यांनी मिश्कीलपणे त्यांच्या खास शैलीत मारलेल्या कोपरखळ्या, या शेवटच्याच असतील, असे काल अजिबातच वाटले नव्हते.
अजितदादांचं असं जाणं हे अख्ख्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अजितदादांनी महाराष्ट्रात स्वतःचं असं राजकारणाचं मॉडेल उभं केलं. सर्वसामान्य माणसासाठी सत्ता कशी वापरायची, हे त्यांनी गेली 40 वर्षे महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्यांनी राजकारणात केलेला संघर्ष आणि धाडस ही पुढची अनेक वर्षे महाराष्ट्राला लक्षात राहील. महाराष्ट्राच्या इकॉनॉमीची नस माहीत असणं, प्रशासनावर कमांड असणं, सकाळी पाचपासूनच काम करायचा आवाका असणं... या गोष्टींमुळे अजितदादा पवार यांची ओळख उत्तम प्रशासक म्हणून झाली होती. त्यांची राज्यभर धडाडीचा नेता अशी क्रेझ होती ती याचमुळे. असे अजितदादा आपल्यात नसणे ही राज्याचीच लाँग टर्म हानी आहे.