

आ. जयंत पाटील
अजितदादा पवार यांचे असे विमान अपघातात जाणे केवळ आम्हालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला धक्का आहे.
अजितदादा आणि माझा तीसहून अधिक वर्षांचा स्नेह. मी, दिलीपराव वळसे-पाटील, आर. आर. आबा, अजितदादा असे आम्ही सर्व एकाच वेळी विधानसभेत आमदार म्हणून आलो आणि त्यामुळेच प्रदीर्घ काळ सोबत काम करता आले. अजितदादांची काम करण्याची पद्धत मी फार जवळून अनुभवली. ते खर्या अर्थाने तळागळातून आलेले नेते यासाठी होते की, त्यांनी शेतीतील भाजीपाला विकणे इथपासून ते संस्था सांभाळणे, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशा सार्या जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या. ते पवारसाहेबांचे पुतणे असले, तरी कार्यकर्ता ते राज्याचा उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास होता. अजितदादा 16 वर्षे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. त्या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी 300 कोटींहून 1 लाख 60 हजार कोटींपर्यंत पोहोचल्या. अत्यंत सक्षमपणे त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सांभाळल्याने त्यांना आदरणीय साहेबांनी लोकसभेवर जाण्याची संधी दिली आणि ते प्रचंड मताधिक्याने लोकसभेवर निवडून गेले.
बहुधा अजितदादांच्या खमक्या स्वभावाला लोकसभा रुचली नसावी की काय, ते लगेच महाराष्ट्राच्या विधिमंडळात परतले. सुधाकरराव नाईक यांनी अजितदादांच्या कामांचा झपाटा बघून त्यांची कृषी आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री म्हणून निवड केली. त्यानंतर पवार साहेबांच्या मंत्रिमंडळातही अजितदादांनी उत्तम कामगिरी बजावली. 1995 ते 1999 या काळात आम्ही सर्वजण विरोधी पक्षात होतो. त्यावेळी मी, दादा, आबा, दिलीपराव असे एकत्र विधानसभेत बसायचो. पत्रकारांनी त्यावेळी आम्ही सभागृहात बसायचो त्या जागेला ‘अशांत टापू’ असे नाव दिले होते.
आम्ही विरोधी पक्षात असताना सरकारच्या चुकीच्या धोरणांवर अक्षरश: तुटून पडत असू. 1999 मध्ये आम्ही एकाच वेळी कॅबिनेट मंत्री झालो. माझ्याकडे अर्थ खाते होेते. अजितदादांकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी होती. पुढे 15 वर्षे सत्तेत असताना आणि नंतरही महाविकास आघाडीच्या काळात आणि आता पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून जी-जी खाती अजितदादांना मिळाली त्यात त्यांनी अत्यंत समरस होऊन काम केले. मंत्रिमंडळ बैठकीत दादा जनतेच्या भूमिका अत्यंत ताकदीने मांडत.
प्रशासनावरील पकड पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व बारामती तालुक्याच्या विकासात त्यांचे असलेले योगदान हे अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. सार्वजनिक जीवनात इतकी वर्षे वावरल्यानंतरही अजितदादा व्यसनांपासून लांब होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही ते व्यसनांपासून दूर राहण्याची सक्त ताकीद देत असत. सकाळी सात वाजल्यापासून कामाला लागणे, कामात शिस्त बाळगणे व दिलेला शब्द पाळणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. अनेकदा वरवर जरी ते कडक स्वभावाचे वाटत असले, तरी आतून ते मृदू आणि हळव्या स्वभावाचे होते. अजितदादांनी साठी पार केली यावर विश्वासच बसत नाही, इतके ते तरुण आणि उत्साही वाटत होते. जीवनातील सर्व आव्हानांना तोंड देण्याची अजितदादांमध्ये क्षमता होती. राज्याच्या राजकारणात अजून मोठी भूमिका ते पार पाडतील, असा आम्हाला विश्वास असताना नियतीने त्यांना अशाप्रकारे हिरावून नेले आहे. दादांच्या जाण्याने मी एक सच्चा मित्र आणि सहकारी गमावला. माझ्या जीवनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.