कोल्हापूर : बालकांतील आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उपचारही महाग होत चालले आहेत. यामुळे बालकांसाठी आरोग्य योजना वाढवाव्यात, त्याद्वारे अधिकाधिक वैद्यकीय सुविधा द्याव्यात, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले. मंगळवार पेठेतील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटलचा तिसरा वर्धापन दिन आणि युनिट-2 चा प्रारंभ डॉ. जाधव यांच्या हस्ते झाला. बालकांवरील उपचाराच्या सर्व सुविधा एकाच छताखाली देणारे हे हॉस्पिटल आता बालकांच्या आजारपणावरील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल झाल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
डॉ. जाधव म्हणाले, नवजात शिशू, लहान मुले बोलू शकत नाहीत. त्यांचे आजार समजून घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करणे म्हणजे डॉक्टरांचे कौशल्यच आहे. अत्यंत जिकिरीचे हे काम बालरोगतज्ज्ञांना करावे लागत असते. लहान मुलांतील व्याधी वाढत आहेत, त्यावरील अत्याधुनिक उपचाराकरिता पुणे-मुंबईला जावे लागत होते. मात्र, अशा सर्व सुविधा एकाच छताखाली देण्याचे शिवधनुष्य या हॉस्पिटलने यशस्वी पेलले. हे हॉस्पिटल नसून लहान मुलांचे आरोग्य मंदिर आहे. येथील डॉक्टर देवदूतच आहेत.
देशात बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कुपोषित बालकांचे प्रमाणही चिंताजनक आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, बदलत्या जीवनशैलीने बालकांतील आजारांचेही प्रमाण वाढत चालले आहे. 2030 मध्ये भारत हा तरुणांचा देश होणार आहे. तरुण मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. देशात दररोज 67 हजार बालके जन्माला येतात. तर दर मिनिटाला एका बालकाचा मृत्यू होत आहे. हे प्रमाण चिंताजनक आहे. बालकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा, सुविधा वाढल्या पाहिजेत. याकरिता शासनाने बालकांच्या आरोग्य योजना वाढविल्या पाहिजेत. देशात जीडीपीच्या 2.1 टक्के खर्च आरोग्यावर केला जातो. अन्य देशांच्या तुलनेत तो नगण्यच आहे. तो वाढविला पाहिजे.
वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमता यासारख्या तंत्रज्ञानाने अमूलाग्र बदल होत आहेत. हे बदलही आत्मसात केले पाहिजेत, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, गंभीर आजाराचे निदान आणि उपचार करण्याची मोठी क्षमता या तंत्रज्ञानामध्ये जरी असली, तरी मानवाच्या मेंदूची जागा रोबोट घेऊ शकत नाही. पैशाने नव्हे, तर रुग्णांच्या चेहर्यावरील हास्य पाहून डॉक्टरांच्या चेहर्यावरही हास्य येते. पैशाने औषध घेता येते; मात्र आरोग्य नाही. यामुळे सुद़ृढ आणि सक्षम पिढी निर्माण व्हायची असेल, तर उत्तम आरोग्य महत्त्वाचे आहे. त्याकरिता वैद्यकीय सुविधा वाढविण्याची गरज आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश तरकसबंद प्रास्ताविकात म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्व वैद्यकीय सुविधांसह 1 दिवसापासून 18 वर्षांपर्यंतच्या बालकांवर उपचार केले जातात. तीन वर्षांत 6 हजार 900 बालकांवर यशस्वी उपचार केले आहेत. लहान मुलांत कॅन्सरचे प्रमाण वाढत चालल्याने भविष्यात हिमो डायलेसिस उपचार पद्धती सुरू करण्याचा विचार आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर म्हणाले, डॉक्टरांची कमीत कमी गरज भासावी, याकरिता जनजागृती होणे आवश्यक आहे.
प्रारंभी डॉ. जाधव यांच्या हस्ते फित कापून साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या युनिट-2 चे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशांत साळुंखे यांचा तसेच गंभीर आजारातून बरे झालेल्या बालकांचा डॉ. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. रुपाली पाटील यांनी आभार मानले. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय गावडे, डॉ. अमोल गिरवलकर, डॉ. अमर नाईक, डॉ. अमृता शिवछंद, डॉ. पूनम रायकर, डॉ. संचेती पाटील, डॉ. विनय कुर्ले, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. राहुल पाटील, डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. वर्षा पाटील आदींसह डॉक्टर, नातेवाईक उपस्थित होते.