कोल्हापूर : आचारसंहितेचे पालन, मतदान, मतमोजणी अशा सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडा, त्यासाठी योग्य नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिल्या. दूरद़ृश्यप्रणालीद्वारे त्यांनी तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाश राहील, अशी सुविधा उपलब्ध करून द्या. सायंकाळी लवकर अंधार पडत असल्याने लाईट व्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता घ्या. अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास बॅटरी उपलब्ध ठेवा. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त वाढवा.
बैठकीत मतदान केंद्रांवरील सोयीसुविधा, आदर्श व महिला मतदान केंद्रांची व्यवस्था, मतदान साहित्याचे वितरण, केंद्रांवर जाण्याचे नियोजन, मतदान दिवशी रिपोर्टिंगची वेळ, तसेच मत मोजणीसंबंधीची माहिती व आकडेवारी वेळेवर देण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. ईव्हीएम मशिन्समध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास तत्काळ दुरुस्त करून मतदान प्रक्रिया सुरू ठेवा, अशा सूचनाही येडगे यांनी दिल्या.
बैठकीला महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दूरद़ृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.