इचलकरंजी येथील के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.  Pudhari photo
कोल्हापूर

Devendra Fadnavis : संभाजी महाराजांना दगाफटका झाला नसता तर देशाचा इतिहास वेगळाच असता : CM फडणवीस

इचलकरंजीत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : "औरंगजेबाला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रावर कब्जा करता येईल. महाराष्ट्रावर कब्जा केला तर हिंदवी स्वराज्यच संपून जाईल; पण छत्रपती संभाजी महाराज ही एक तळपती तलवार होती. नऊ वर्षे त्यांनी औरंगजेबाला झुंजवलं. औरंगजेब महाराष्ट्रात आला; पण मराठ्यांनी त्याची कबरच महाराष्ट्रातच खोदली. औरंगजेबाला कधीच मराठी मुलुख जिंकू दिला नाही. नऊ वर्षांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी १२० लढाया लढल्या. यातील एकही लढाई कधी हरले नाहीत. संभाजी महाराज हे दगाफटक्यामध्ये शहीद झाले नसते तर देशाचा इतिहास वेगळाच असता," अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (दि. १५ डिसेंबर) महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाचे स्मरण केले. इचलकरंजी येथील के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न

शंभू तीर्थाचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भगवा रंग कोठेही दिसला नसता. म्हणून महाराजांचे आपल्यावर असणारे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा या देशातील असा देदीप्यमान इतिहास आहे की, तो प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच पाहिजे. दुर्दैवाने आमच्या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा स्वातंत्र्यानंतरही दडपण्याचा प्रयत्न झाला. अगदी काल-परवापर्यंत 'सीबीएसई' अभ्यासक्रमात जो इतिहास शिकवला जायचा, त्या इतिहासामध्ये मोगलांच्या इतिहासाचे १७ पाने होती. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केवळ एक परिच्छेद होता. आम्ही १७ पाने बाबर, अकबर, औरंगजेब हे सगळे शिकायचो; पण आता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. त्यांनी निर्णय बदलला.आता एका परिच्छेदात मोगलांचा इतिहास आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला २१ पाने दिली गेली.आता संपूर्ण मराठी आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास आपल्या मुलांना शिकायला मिळत आहे. खरा इतिहास जनजनात पोहोचत आहे."

संभाजी महाराजांना पराभूत करण्याची ताकद मोगलांमध्ये नव्हती

दगाफटका झाला नसता तर छत्रपती संभाजी महाराज यांना पराभूत करण्याची ताकद औरंगजेब आणि मोगलांमध्ये नव्हती. अशा प्रकारचे संभाजी महाराज लढवय्ये होते. रणनीती, युद्धनीती या सगळ्यावर त्यांची पकड होती. वयाच्या १४व्या वर्षी संस्कृतचा ग्रंथ लिहिणारे पांडित्य देखील छत्रपती संभाजी महाराज यांच्या ठायी होते. ११ भाषा माहिती असलेल्या आमच्या राजाने साहित्याची, नाट्याची निर्मिती केली. शौर्य काय असते ते आपल्याला सांगितले. सूर्यासारखी प्रतिमा असलेले आमचे संभाजी महाराज होते. दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराज हे दगाफटक्यामध्ये शहीद झाले नसते तर या देशाचा इतिहास वेगळा राहिला असता, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

महाराजांच्या देदीप्यमान कारकीर्दीमुळेच आज आम्ही स्वाभिमानाने उभे

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी क्रांतीज्योत पेटवली होती. यामुळेच मराठे नंतरही थांबले नाहीत. त्यांनी झुंज कायम ठेवून मोगली साम्राज्याचा नायनाट करून संपूर्ण भारत ते अफगाणिस्तानपर्यंत हिंदवी स्वराज्य नेण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या देदीप्यमान कारकीर्दीमुळेच आज आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत. हा स्वाभिमानाचा पुतळा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT