कासारवाडी: पुढारी वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील कासारवाडीसह परिसरात मंगळवारी (दि.24) ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नाले ओढ्यांना पूर आला तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच या परिसरात काढणीला आलेले सोयाबीन , भुईमूग पीकांमध्ये पाणी साठल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पावसाळ्यातही इतका मोठा पाऊस झाला नाही. मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर ढगफुटीसदृश पाऊस झाला. सुमारे दोन अडीच तास एकसारखा पाऊस या परिसरात कोसळत होता. मुसळधार पावसाने शेतातील उभी पिके भुईसपाट केली कासारवाडी, अंबपवाडी, मनपाडळे, पाडळी, अंबसह परिसरात या पावसाचा चांगलाच तडाखा बसला. शिरोली (पु.) आणि वाठार तर्फ वडगांव महसूल मंडळातील गावामध्ये या पाऊसाचा तडाखा बसल्याने काढणीस आलेले सोयाबीन भुईमुग पिक पाण्यात गेल्याचे दिसून आले. तर पुणे बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गालगत टोप येथील शेतकरी पंपाजवळ सेवा रस्त्याच्या सुमारे पाच ते सहा फूट भराव वाहून गेल्याने वाहतुकीस धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कासारवाडी फाटा टोप येथे पूल बांधण्याचे काम सुरू असल्याने अनेक वाहने सेवा रस्त्याने प्रवास करतात हा सेवा मार्ग शेतकरी पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात खचला आहे. येथे वाहतुकीस धोका निर्माण झाली आहे.