कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा: येथील पंचगंगा अनवडी नदीतील जलपर्णी हटवण्याचे काम कुरुंदवाड पालिका प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी व स्वच्छता विभागाचे कर्मचारी शिवतीर्थजवळ नदीची स्वच्छता करण्यासाठी सहभागी झाले होते. पालिका प्रशासन नदीच्या स्वच्छतेसाठी सरसावल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
पटवर्धन संस्थान सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी शिरढोण पाणवट्यानजीक आडगाणे मळ्या समोरुन पंचगंगा नदी फोडली होती. पुन्हा ही नदी भैरेवाडी व कुरुंदवाड शहराच्या मध्यभागातून नृसिंहवाडी पाणवठ्याजवळ पंचगंगा नदीला जोडली आहे. या नदीला अनवडी म्हणून ओळखले जाते. अनवडी पावसाळ्यात चार महिने तुडुंब भरून वाहत असते. तर आठ महिने या नदीवर शिरोळच्या जुन्या रस्त्याजवळ बांध घालून पाणी अडवले जाते. पूर्वी नागरिक या नदीत अंघोळ करून पाणी घरी नेत होते.
सध्या अनवडी नदीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे अनवडी नदीला प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात जलपर्णीचा विळखा पडतो. पावसाळ्यात अनवडी नदी वाहती होते. आणि पुन्हा सावगावे मळी जवळ पंचगंगा नदीला या अनवडी नदीचा संगम होतो. अनवडी नदीचे पुन्हा अस्तित्व जपण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जलपर्णी मुक्तीचा जागर सुरू केला आहे. नागरिकांनी आपला लोकसहभाग घेऊन नदी जलपर्णी मुक्तीसाठी सरसावणे गरजेचे आहे.
पंचगंगा अनवडी नदीत जलपर्णी निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेतर्फे उन्हाळ्यात उपाय योजना राबवण्यात येतील. नदीच्या दोन्ही बाजूला शहर परिसरात संरक्षक भिंत उभारली जाईल. भैरववाडी ते शिवतीर्थ असा बायपास रस्ता करण्यासाठी आणि अनवडी नदीत बोटिंग सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
– आशिष चौहान, मुख्याधिकारी
हेही वाचा