कोल्हापूर : भीषण आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शेजारी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मंत्री शंभूराज देसाई, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी व इतर. Pudhari File Photo
कोल्हापूर

केशवराव भोसले नाट्यगृह वर्षभरात उभारणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाशी सर्वांचे भावनिक नाते आहे. त्यामुळे जसे होते तसेच हे नाट्यगृह वर्षभरात उभारू, अशी ग्वाही देत याकरिता युद्धपातळीवर प्रक्रिया राबविली जाईल. नाट्यगृहासाठी 25 कोटींचा आराखडा केला आहे. विम्याचे 5 कोटी मिळतील. उर्वरित 20 कोटी राज्य शासन देईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी 7.35 वाजता कोल्हापुरातील आगीत बेचिराख झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह इतर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग दुदैर्वी घटना आहे. नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाच्या उभारणीसाठी राजर्षी शाहू महाराज परदेशात जाऊन आले. तब्बल 109 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी सागवान लाकूड वापरून नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदान उभारले. नाट्यगृहाची घडणावळ ऐतिहासिक आहे. महाराष्ट्रात नाट्यगृह खूप आहेत. परंतु, केशवराव भोसले नाट्यगृहाशी कोल्हापूरबरोबरच महाराष्ट्रातील कलावंत आणि श्रोत्यांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. अशी वास्तू पुन्हा होणे नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्टला नाट्यगृहाला आग लागली. आगीमध्ये नाट्यगृह जळून खाक झाले. हे सर्वांसाठी वेदनादायी आहे. महाराष्ट्रातील सर्व कलावंत आणि श्रोते यांचे या नाट्यगृहाशी जिव्हाळ्याचे नाते आहे. नाट्यगृहाशी आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. कलावंत, आर्किटेक्ट यांच्यासह सर्वजण मदतीसाठी पुढे येत आहेत. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनासह सर्वांचे योगदान घेऊन नाट्यगृह जसेच्या तसे उभारले जाईल.

मुख्यमंत्री शिंदे यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाबरोबरच शाहू खासबाग मैदानातही जाऊन पाहणी केली. यावेळी आ. प्रकाश आबिटकर, माजी आ. चंद्रदीप नरके, माजी आ. अमल महाडिक, भाजप नेत्या चित्रा वाघ, सत्यजित कदम यांच्यासह इतर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांना आगीच्या घटनेबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी माहिती दिली. 8 ऑगस्टला रात्री 9.30 वाजता आग लागली. घटनेची माहिती मिळताच महापालिका व जिल्हा प्रशासनातील अधिकारी दाखल झाले. जिल्ह्यातील अग्निशमन दलाची वाहने बोलावण्यात आली. घटनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. तसेच पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, फॉरेन्सिक लॅबने तपासासाठी नमुने घेतले आहेत. नाट्यगृहाचा 5 कोटींचा विमा उतरविला आहे, असे जिल्हाधिकारी व प्रशासकांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT