चेतन पाटील याचे घर 
कोल्हापूर

शिवरायांच्या पुतळ्याचा चबुतरा बांधणारा शिवाजी पेठेतील कंत्राटदार फरार

सिंधुदुर्ग पोलिस पथकाचे कोल्हापुरात ठाण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळ्याचे काम करणार्‍यांचा शोध सुरू झाला. त्यामध्ये कोल्हापूर कनेक्शन पुढे आल्यानंतर डॉ. चेतन एस. पाटील याचे नाव एका रात्रीत चर्चेत आले. शिवाजी पेठेमध्ये राहूनदेखील शेजार्‍यांशी संपर्क नसणारा डॉ. पाटील ही घटना घडल्याच्या दिवशी घराला कुलूप लावून फरार झाला आहे.

डॉ. चेतन पाटील मूळचा कोल्हापूरचा असून, त्याने आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो कोल्हापुरातील एका खासगी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. बांधकाम सल्लागार म्हणून तो काम करत होता. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्याने पीएच.डी. केली आहे. अनेक प्रकल्पांचे त्याने सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालमीजवळ राहणार्‍या डॉ. पाटील याची पत्नी डॉक्टर असून, त्या खासगी प्रॅक्टिस करतात. पाटील दाम्पत्याला एक मुलगा असून, तो दहावीमध्ये शिकत आहे. परंतु, हे कुटुंब नेहमीच शेजार्‍यांपासून अलिप्त राहिले असल्यामुळे, शेजार्‍यांनादेखील त्यांच्याबद्दल फारसे माहीत नाही.

मालवण राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन एस. पाटील याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक आदी गंभीर कलमे लावत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीम परिसरात डॉ. पाटील राहत असून, मंगळवारी मालवण पोलिस जुना राजवाडा पोलिसांच्या मदतीने घरी पोहोचले. त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली, तेव्हा डॉ. पाटील घरी नव्हता. त्याच्या घराला कुलूप असल्याने ते माघारी फिरले.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कारागीर जयदीप आपटे याच्याकडे होते, तर या कामाचा चबुतरा बांधकामासह स्ट्रक्चरल कन्सलटंट डॉ. चेतन पाटील याला देण्यात आले होते. डॉ. पाटील हा शिवाजी पेठेतील रहिवासी असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तो एका स्वायत्त विद्यापीठातील सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत कार्यरत आहे. त्यात तो स्ट्रक्चरल सल्लागार म्हणूनही काम पाहतो. पुतळा उभारणी व त्यासाठीचा चबुतरा बांधकामाची निविदा निघाल्यानंतर डॉ. पाटील याने ती भरली होती. त्याला ते काम मिळाले. डॉ. पाटीलच्या पत्नी डॉक्टर असून, त्यांचे खासगी क्लिनिक आहे. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सोमवारीच डॉ. पाटील आपल्या कुटुंबीयांसह फरार झाला आहे.

त्यामुळे डॉ. पाटील याच्याकडे चौकशी करण्यासाठी मालवण पोलिसांचे एक पथक मंगळवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्याकडून पोलिस बंदोबस्त घेतला. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडूनही अतिरिक्त कर्मचारी मागून घेऊन डॉ. पाटील याचा शोध सुरू केला आहे. मात्र, तो सापडला नाही. वेताळमाळ तालीम परिसरातील रहिवासी आणि त्याच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, पोलिसांना अद्यापही डॉ. पाटील याचा सुगावा लागलेला नाही, त्यामुळे पोलिस पथकाने कोल्हापुरात ठाण मांडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT