कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचा मुक्त्यारी समारंभ म्हणजेच राज्यारोहणाचा सोहळा पार पडला. Pudhri File Photo
कोल्हापूर

छत्रपती शाहूंच्या राज्यारोहण समारंभाचे दुर्मीळ विदेशी वर्णन प्रकाशात

पुढारी वृत्तसेवा

मुरलीधर कुलकर्णी

कोल्हापूर : दिनांक 2 एप्रिल 1894 रोजी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचा मुक्त्यारी समारंभ म्हणजेच राज्यारोहणाचा सोहळा पार पडला. पाच दिवस चाललेल्या या समारंभाचे वर्णन आजवर आपल्याला तत्कालीन मोजक्या पत्रांतूनच समजून घ्यावे लागत असे; पण या समारंभाची माहिती देणारा अस्सल वृत्तांत कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक यशोधन जोशी यांनी दोन वर्षांपूर्वी प्रकाशात आणला. बाळाजी महादेव करवडे यांनी लिहिलेले आणि 1896 साली प्रकाशित झालेले ‘मुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव’ हे पुस्तक जोशी यांनी नवीन संदर्भ व मजकुराची भर घालून आणि डॉ. रमेश जाधव यांच्या प्रस्तावनेसह 2022 मध्ये वाचकांच्या भेटीस आणले. कोल्हापूरच्याच चेतन कोळी यांच्या कृष्णा पब्लिकेशन्सने त्याचे नव्या ढंगात खासदार शाहू महाराजांच्या हस्ते प्रकाशनही केले होते.

बाळाजी महादेव करवडे हे पट्टणकोडोली, पेटा, आळते इथल्या शाळेत हेडमास्तर होते. करवडे गुरुजींनी हा समारंभ प्रत्यक्ष पाहून त्याचे वर्णन लिहून ठेवल्याने या पुस्तकाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होते. आता या दस्तऐवजाला आणखी एका तत्कालीन अधिकृत कागदपत्रांची जोड मिळत आहे. मुंबईच्या गव्हर्नरसोबत या समारंभाला हजर असणार्‍या मिसेस लँग नावाच्या बाईंनी आपल्या दैनंदिनीत शाहू महाराजांच्या मुक्त्यारी समारंभाचे म्हणजेच राज्यारोहण सोहळ्याचे वर्णन लिहून ठेवल्याचे यशोधन जोशींना कळाले. त्यांच्या वंशजांशी संपर्क साधून त्यांनी त्या नोंदी मिळवल्या आहेत. याच सुमारास जी. सी. डायसन नावाचा एक ब्रिटिश गृहस्थ भारतात फिरायला आलेला होता. ब्रिटिश रेसिडेन्सीत असणार्‍या त्याच्या मित्राला भेटायला तो कोल्हापूर संस्थानात आलेला होता. राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारात उपस्थित राहून त्यावेळी कोल्हापूर संस्थानातल्या एका तरुण जहागीरदाराला त्याच्या जहागिरीचे अधिकार देण्याचा जो समारंभ झाला, त्याचे वर्णन डायसनने लिहून ठेवले आहे. हे वर्णनही तत्कालीन संस्थानी रीतिरिवाज आणि कामकाजाच्या पद्धती समजून घेण्याच्या द़ृष्टीने उपयुक्त आहे.

कोण होत्या मिसेस लँग?

मिसेस लँग या राजर्षी शाहू छत्रपतींच्या राज्यारोहण समारंभाला हजर असणार्‍या आणि या समारंभाचे वर्णन लिहून ठेवणार्‍या (बहुधा) एकमेव व्यक्ती असाव्यात. त्यांचे पती हे बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये पॉलिटिकल खात्यात अधिकारी होते; पण ते मात्र या समारंभाला हजर नसावे. कारण टाऊन हॉल इथे झालेल्या ब्रिटिश पाहुण्यांच्या मेजवानीसाठी उपस्थित असलेल्या मंडळीत त्यांचे नाव सापडत नाही; पण लँग बाई मात्र या मेजवानीच्या वेळी गव्हर्नरच्या शेजारी बसलेल्या होत्या हे या समारंभाच्या बैठक व्यवस्थेवरून लक्षात येते. याशिवाय राज्यारोहण समारंभाच्या वेळीही त्या गव्हर्नरच्या पत्नीसोबत होत्या. यावरून त्या उच्चभ्रू वर्गातल्या होत्या हे निश्चित.

राजर्षी शाहू छत्रपतींच्या दरबाराचे प्रत्यक्ष वर्णन

सी. सी. डायसन हा ब्रिटिश नागरिक इंग्लंडमधून साधारणपणे 1894-95 च्या सुमारास भारतात आलेला होता. भारताला भेट देण्याचा त्याचा मूळ उद्देश बहुधा पर्यटन हाच असावा. कारण त्याने कुठेही आपण भारतात का आलो, याचा उल्लेख केलेला नाही. त्यावेळी त्याने दिल्ली, जयपूर, जोधपूर, ग्वाल्हेरसह पंजाबमधल्या काही भागांना भेट दिलेली होती. कोल्हापूरला असणार्‍या ब्रिटिश रेसिडेन्सीत त्याचा मित्र अधिकारी होता. त्याला भेटायच्या उद्देशाने डायसन कोल्हापूरला आलेला होता. ब्रिटिश रेसिडेंट आणि छत्रपती महाराज यांच्या दोघांच्या उपस्थितीत होणार्‍या एका दरबारालाही उपस्थित राहण्याची संधी त्याला मिळालेली होती. हा दरबार एका तरुण जहागीरदाराला त्याच्या जहागिरीवर स्थापित करून त्याला मुखत्यारी देण्यासाठी भरवलेला होता. हा समारंभ म्हणजे भारतीय आणि ब्रिटिश परंपरा यांचा मिलाफ होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT