Chandrakant Patil On Gautmi Patil :
चंद्राकांत पाटील यांचा गौतमी पाटीलला उचलायचं का असं म्हणताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर गौतमी पाटील यांच्या गाडीनं एका रिक्षा चालकाला उडवल्याचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. पाटील यांनी याच प्रकरणाची माहिती घेत असताना डीसीपी संभाजी कदम यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळं आता गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होणार असं वाटलं.
मात्र आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील हा विषय संपला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, 'गौतमी पाटील यांनी त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी स्वतः उचलणार असल्याचं मान्य केलं आहे. त्यांनी मी त्या गाडीत नव्हते असं देखील सांगितलं आहे. त्यामुळं आता गौतमी पाटील हा विषय संपला आहे.'
वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk) परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका गंभीर अपघाताप्रकरणी (Accident) प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिला पुणे शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अपघातात वापरले गेलेले वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने तिच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे.
दोन दिवसांपूर्वी वडगाव बुद्रुक येथे एका रिक्षाला भरधाव गाडीने धडक दिली होती. या अपघातात रिक्षा चालक विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तपासणी केली असता, अपघाताला कारणीभूत असलेले हे वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले.
गौतमी पाटील ही या अपघातग्रस्त वाहनाची मालक असल्याने पुणे पोलिसांनी तिला कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीस बजावली होती. या प्रकरणामुळे वाहन मालक म्हणून गौतमी पाटीलवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. सध्या पुणे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.