Chandrakant Patil Poster: कोल्हापुरात नुकतेच गोकुळच्या चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. जरी समविचारी आघाडीला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या असल्या तरी महायुतीने शासन नियुक्त संचालकांच्या जोरावर आपला चेअरमन खुर्चीवर बसवला. माजी आमदार राजेश पाटील हे गोकुळचे चेअरमन झाले असून त्यांच्या निवडीनंतर महायुतीच्या सर्व नेत्यांनी जोरदार भाषणे ठोकली होती. त्यातील विशेष लक्षवेधी भाषण हे चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांनी संघर्ष मोर्चावेळी त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला आणि ट्रोलिंगला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असूनही पुण्याच्या कोथरूडमधून निवडणूक लढवतात यावरून त्यांच्यावर टीका अन् ट्रोलिंग होत असतं. आता गोकुळवर महायुतीचा झेंडा फडकवल्यानंतर या यशाचे कारभारी संबोधले गेलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात पोस्टर लागले आहेत.
या पोस्टरवर, 'चंद्रकांत दादांना ट्रोल करणे सोपे आहे चंद्रकांता दादा होणे सोपे नाही असं लिहिलं आहे. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लावण्यात आले असून त्यात चंद्रकांत दादांचा फेटा घेतलेला अन् हातात काठी घेतलेला पाटीलकीच्या लूकमधील फोटो लावण्यात आला आहे.
गोकुळ निवडणुकीच्यावेळी चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर समविचारी आघाडीकडून टीका करण्यात आली होती. जिल्ह्यातील या दोन नेत्यांनीच समविचारीला बहुमत असतानाही शासनाच्या माध्यमांतून तांत्रिक मुद्दा पुढे करत सत्ता बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांच्यावर टीका करताना जर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी त्यांचे साम्राज्य उद्धवस्त करून टाकेन असे आव्हान दिलं होतं. त्याला सतेज पाटील यांनी देखील शासन अन् सत्तेच्या जोरावर संपवण्याची भाषा करू नका मी देखील पाटील आहे. विधानसभेच्या आखाड्यात समोरासमोर लढू असे प्रती आव्हान दिलं होतं.