Tillarinagar Goa Highway Car Crash Pudhari
कोल्हापूर

Tillarinagar Car Accident | तिलारीनगर-गोवा मार्गावर कारचा भीषण अपघात; बेळगावचा बांधकाम कंत्राटदार जागीच ठार

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले; अन्य तिघे जखमी, पाटणे फाटा-तिलारीनगर-गोवा मार्गावर दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

Tillarinagar Goa Highway Car Crash

चंदगड : चंदगड तालुक्यातील पर्यटनस्थळाला भेट देऊन परतणाऱ्या बेळगाव येथील पर्यटकांच्या कारला मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बेळगाव येथील मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसचे बांधकाम कंत्राटदार विनायक नेताजी कलिंग (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य तिघे जखमी झाले. बेळगाव-वेंगुर्ला राज्य मार्गावरील पाटणे फाट्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर तिलारीनगर-गोवा मार्गावर मेघा इंजिनिअरिंग कारखान्यासमोर ही घटना घडली.

मृत विनायक कलिंग हे मूळचे हलगा येथील असून, सध्या जयनगर, बेळगाव येथे वास्तव्यास होते. ते बांधकाम कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. या अपघाताची फिर्याद कारमधील सहप्रवासी पप्पू गंगाराम भोसले (वय ४४, रा. ज्योतीनगर, गणेशपूर, बेळगाव) यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी कारचालक मयूर बसय्या कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विनायक कलिंग, पप्पू भोसले, कारचालक मयूर कांबळे आणि जयंत असे चार मित्र कारने आंबेवाडी (ता. चंदगड) येथील निसर्गरम्य जलाशय परिसरात पर्यटनासाठी आले होते. दिवसभर पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर ते सायंकाळी बेळगावच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले. रात्री नऊच्या सुमारास तिलारीनगर-पाटणे फाटा मार्गावर मेघा इंजिनिअरिंग कारखान्यासमोर अचानक एक कुत्रा त्यांच्या कारसमोर आडवा आला.

कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक मयूर कांबळे याने कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात कारवरील त्याचे नियंत्रण सुटले. कार रस्त्यालगत असलेल्या कापलेल्या झाडाच्या बुंध्यावर चढली आणि त्यानंतर पुढे असलेल्या दुसऱ्या झाडाला जोरात धडकली. या धडकेनंतर कार सुमारे दीडशे फूट अंतर रस्त्यावर घासत गेली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.

या दुर्घटनेत विनायक कलिंग हे गंभीर जखमी होऊन घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात येत होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहप्रवासी पप्पू भोसले यांच्या खांद्याला जबर मार लागला असून, चालक मयूर कांबळे आणि जयंत हेही किरकोळ जखमी झाले.

दरम्यान, बेदरकारपणे वाहन चालवून विनायक कलिंग यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक मयूर कांबळे याच्याविरुद्ध चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. गेंगजे करीत आहेत.

मृत विनायक कलिंग यांच्या पार्थिवावर हलगा, बेळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगी आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT