मिणचे खुर्द, पुढारी वृत्तसेवा : भुदरगड तालूक्यातील बसरेवाडी येथे दुधगंगा उजवा कालवा फुटून, कालव्याचे पाणी शेतात घुसले.त्यामुळे शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाटबंधारे खात्याने या कालव्याच्या अस्तरिकरणाकडे गांभीर्याने लक्ष देवून शेतीसह पिकांची झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
गेली कित्येक वर्ष हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो दरवर्षी या कालाव्याच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होतो. कालव्याच्या अस्तरीकरणासह मजबूतीकरणाचा प्रश्न अनुत्तरीत राहीला प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेवून आमदार प्रकाश आबिटकर यांनी कालव्याच्या अस्तरीकरणासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून २१ कोटीचा निधी मंजूर केला. पाटबंधारे खात्याने या कालव्याच्या अस्तरीकरणासह मजबूती करणाकडे गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे. या कालवा फूटीची प पाहाणी प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, मंडल आधिकारी, तलाठी इरफान सनदी, माजी सरपंच संदीप पाटील, उप सरपंच रवि देवेकर यांनी केली.
दुधगंगा उजवा कालवा शाखा कूरचे मिणचे खुर्द पर्यंतचे दुरुस्तीचे व सफाईचे काम प्रत्येक वर्षी करण्यात येते. हे काम नियमांप्रमाणे होत नाही, अशा तक्रारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केल्या होत्या. बुधवारी (दि.31) बसरेवाडी येथे कालवा फुटून कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले. यामुळे पिकासह शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या कालव्याचे काठ ढासळणे कालवा फुटणे हे प्रत्येक वर्षी सुरूच असते. पावसाळ्यात तर कालव्याचे काठ ढासळून कालव्याचे अस्तित्व नष्ट होते.