कोल्हापूर

कोल्हापूर: वाळवे खुर्द येथे कालव्यात पडून बैलजोडीचा मृत्यू

अविनाश सुतार

कसबा वाळवे: पुढारी वृत्तसेवा : बैलाचा पाय घसरून छकडा गाडी कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कालव्यात बुडून सर्जा-राजा बैलजोडीचा करून अंत झाला. तर छकड्याखाली सापडलेला गाडीवान मात्र, सुदैवाने बचावला. ही ह्रदयद्रावक घटना आज (दि.१९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पालकरवाडी (ता. राधानगरी) वाळवे खुर्द हद्दीतील कालव्यामध्ये घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, वाळवे खुर्द (ता.कागल) येथील दिलीप पांडुरंग खुटाळे हे शेतीची मशागत करण्यासाठी आज पहाटे छकडा गाडी घेऊन शेताकडे गेले होते. काम आटोपल्यानंतर जनावरांसाठी छकडा गाडीमध्ये वैरण भरुन कालव्याच्या काठावरून घरी चालले होते. यावेळी अचानक एका बैलाचा पाय घसरल्याने दोन्ही बैल गाडीसह कालव्यात कोसळले. छकडा पलटी होऊन खुटाळे छकड्याखाली सापडले.

कसाबसा निकराचा प्रयत्न करुन ते पाण्याबाहेर आले आणि आरडाओरड केला. दरम्यान दोन्ही बैलांच्या गळ्याला सापत्या आवळल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला. शिवारातील लोक जमा होईपर्यंत सर्जा-राजाचा करून अंत झाला होता. पोटच्या पोरांप्रमाणे जपलेल्या सर्जा-राजाचा डोळ्यादेखत तडफडून मृत्यू झाल्याचे पाहून खुटाळे यांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.

दरम्यान, गेल्या महिन्यात पिंपळवाडी (ता. राधानगरी) येथे विजांच्या कडकडाटाने बुजून विहिरीत पडल्याने दोन्ही बैलांना जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असताना आता दुसरी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दिलीप खुटाळे यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. वडिलार्जित शेती करीत भाड्याने शेतमशागत करण्यासाठी त्यांनी ही बैलजोडी पाळली होती. त्यावरच उदरनिर्वाह चालू होता. या दुर्घटनेमुळे त्यांचे दोन लाखांवर नुकसान झाले आहे. दोन्ही बैलांच्या मृत्यूने त्यांचे दोन्ही हात गेल्याची अवस्था झाली आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT