कोल्हापूर : भाजप, शिवसेनेतही उमेदवारीवरून रात्रीत काही बदल झाले. भाजपमधून अशोक चराटींना ऐनवेळी संधी मिळाली, तर शौमिका महाडिक यांना महिला राखीवमधूनच उमेदवारी मिळाली. तर शिवसेनेत आमदार चंद्रदीप नरके यांनी रात्रीत सूत्रे हलवत ठराव संख्येचे दबावतंत्र वापरत चार जागा पदरात पाडून घेतल्या. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या एका जागेला कात्री लागली.
भाजपमध्येही बुधवारी रात्री उमेदवार निश्चित होते. मात्र, उमेदवारांवरून आ. शिवाजी पाटील काहीसे नाराज दिसले. त्यांनी माझे तीन उमेदवार क्लिअर असतील असे प्रसारमाध्यमांना सांगत ते बैठकस्थळावरून बाहेर पडले. गुरुवारी सकाळी भाजपमध्येही काही बदल झाले. बुधवारी रात्री धैर्यशील देसाई यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र, सकाळी त्यांना थांबविण्यात आले. त्यांच्या जागी आजऱ्याचे अशोक चराटी यांना संधी देण्यात आली, तर माजी संचालिका शौमिका महाडिक या सर्वसाधारण गटातून निवडणूक लढणार होत्या. मात्र, त्यांना महिला राखीवमधूनच उमेदवारी देण्यात आली.
महायुतीचे तीन संचालक समविचारीच्या संपर्कात
महायुतीमध्ये गुरुवारी दुपारपर्यंत उमेदवारीवरून चांगलाच गोंधळ सुरू होता. उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने सकाळपासूनच महायुतीचे तीन माजी संचालक समविचारी आघाडीचे नेते आ. सतेज पाटील यांच्या संपर्कात होते. यामधील किसन चौगले यांनी बंडखोरी केली, तर राधानगरी तालुक्यातीलच अन्य एक। माजी संचालक यांनीही आ. पाटील यांच्याशी संपर्क केला. मात्र, आ. पाटील यांनी त्यांना साफ नकार दिला. तर करवीर तालुक्यातीलही एका संचालकाने अजिंक्यातारा कार्यालयात उपस्थिती लावली होती. मात्र, महायुतीमधून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ते महायुतीसोबत कायम राहिले.
पालकमंत्र्यांच्या एका जागेला कात्री
शिवसेनेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना दोन, आ. चंद्रदीप नरके यांना तीन, माजी खा. संजय मंडलिक यांना एक आणि डॉ. सुजित मिणचेकर यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र, आ. नरके यांनी रात्रीत सर्व सूत्रे फिरवत सर्वसाधारण गटातील चार जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. यामुळे पालकमंत्री आबिटकर यांच्या एका जागेला कात्री लागली. मात्र, स्वीकृतची एक जागा आबिटकर गटाला दिली जाणार आहे.