BJP Pudhari
कोल्हापूर

BJP Political Win: पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलले

कोल्हापूर, पुणे पाठोपाठ इचलकरंजी, सांगलीतही भाजपचे महापौर

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्र म्हणजे युतीसाठी दुष्काळी भाग अशी टीका शिवसेना-भाजप युतीचे नेते सातत्याने करीत असत. या भूमीत ना कमळ उगवले ना धनष्यबाण रुजला, अशी बोचरी टीका केली होती. मात्र, आता पुणे व पिंपरी-चिंचवडसह कोल्हापुरात महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचे महापौर विराजमान झाले आहेत; तर इचलकरंजी व सांगलीत बहुमत पाहता भाजपचे महापौर ही केवळ औपचारिकता राहिली आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेस फुटीनंतर राष्ट्रवादीच्या सहकार्याने काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादीतील फूट व भाजपचा आक्रमक पवित्रा यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला. कोल्हापुरात मात्र काँग्रेसने महायुतीला अक्षरशः झुंजविले. पश्चिम महाराष्ट्रात सहकाराच्या जोरावर काँग्रेस व नंतरच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या सत्तेची पाळेमुळे घट्ट केली होती.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपर्यंत काँग्रेसचे आपल्याला पर्याय नसल्यासारखे वागणे होते. नंतरच्या काळात राष्ट्रवादीच्या साथीने त्यांनी सत्ता कायम राखली. मात्र, केंद्रातील सरकार मजबूत झाले. त्यापाठोपाठ राज्यातील राजकारणाला अचानक कलाटणी मिळाली. पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा उभारला व मुख्यमंत्री होऊन बंड यशस्वी करून दाखविले. पाठोपाठी राष्ट्रवादीत फूट पडली. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद भाजपकडे आले व राज्यात भाजपची आक्रमक वाटचाल सुरू झाली.

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता होतीच, पण कोल्हापूर व सांगली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर भाजपने आपला झेंडा उभारला. तर एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसला सांभाळण्याची ताकद असलेल्या इचलकरंजी शहरातही पहिलाच महापौर भाजपचा होण्याची चिन्हे आहेत. एकापाठोपाठ एक संस्थेवर भाजपची हुकूमत वाढत गेली तसे नेत्यांनीही भाजप-शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादीचा हात पकडला.

यातून महायुती ताकदवान झाली तरी खरी राजकीय ताकद ही भाजपलाच मिळाली. तथापि, कोल्हापुरात काँग्रेसने भाजपला अक्षरश: झुंजविले. उमेदवारी देतानाचे काँग्रेसचे एकदोन निर्णय बरोबर ठरले असते तर निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता.

पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपचा महापौर झाला असून, पुण्यात येत्या सोमवारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे. इचलकरंजी येथे महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असून, भाजपचे महापौर-उपमहापौर होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

जनतेला वेगवान प्रगतीची अपेक्षा

काँग्रेस- राष्ट्रवादी-शिवसेना आणि आता भाजप असे वळण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाने घेतले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी केंद्रात भाजप, राज्यात भाजप, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजप हवे. आता डबल इंजिन सरकार आहे ते ट्रिपल इंजिन सरकार करा असे ते सांगत होते. जनतेने ट्रिपल इंजिन सरकार स्थापन केले आहे. आता जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे व नव्याने वाढत असलेल्या नागरी भागात जनतेला वेगवान प्रगतीची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT