आंबा-विशाळगड मार्गावर एका महाकाय 'गवा रेड्या'ने दर्शन दिल्याने पर्यटकांची अक्षरशः पाचावर धारण बसली. Pudhari
कोल्हापूर

Vishalgad Gaur sighting | आंबा-विशाळगड मार्गावर 'गव्या'चे दर्शन; पर्यटकांची बसली पाचावर धारण

उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागले

पुढारी वृत्तसेवा

Amba Vishalgad tourism

विशाळगड : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, पाणी आणि चाऱ्याच्या शोधात वन्यप्राणी आता मुख्य रस्त्यावर येऊ लागले आहेत. गुरुवारी (दि.२६) भरदुपारी आंबा-विशाळगड मार्गावर एका महाकाय 'गवा रेड्या'ने दर्शन दिल्याने पर्यटकांची अक्षरशः पाचावर धारण बसली. रणरणत्या उन्हात रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या या गव्याचा रुबाब पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

फेब्रुवारीअखेर उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. यामुळे तहान भागवण्यासाठी वन्यप्राणी आता पाणवठ्यांच्या शोधात मानवी वस्ती किंवा रस्त्यांकडे धाव घेत आहेत. आज दुपारी २ च्या सुमारास विशाळगडाकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या ताफ्यासमोर अचानक हा गवा आला. साधारण १० ते १५ मिनिटे या गव्याने रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.

उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना थंडगार वाऱ्यासाठी खिडक्या उघड्या ठेवलेल्या पर्यटकांनी, गवा समोर येताच तातडीने गाडीच्या काचा वर चढवल्या. गव्याच्या या दर्शनामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काही धाडसी पर्यटकांनी दुरूनच या गव्याचा रुबाब आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. गव्याने कोणालाही इजा न करता काही वेळ रस्त्यावर फेरफटका मारला आणि त्यानंतर संथ पाऊलांनी तो जवळच असलेल्या घनदाट झाडीत अदृश्य झाला.

विशाळगड आंबा मार्गावरील रस्त्यात गव्याचे झालेले दर्शन

उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राणी अधिक संवेदनशील आणि आक्रमक होण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांनी गाडीतून खाली उतरू नये किंवा प्राण्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

सह्याद्रीचा हा पट्टा जैवविविधतेने नटलेला आहे. गव्यांचे दर्शन होणे हे समृद्ध निसर्गाचे लक्षण असले तरी, मानवाने त्यांच्या क्षेत्रात हस्तक्षेप टाळणेच हिताचे आहे.
— प्रमोद माळी, निसर्गप्रेमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT