

Vishalgad Pavankhind road repair
विशाळगड : कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विशाळगड आणि पावनखिंड मार्गावरील पांढरेपाणी ते केंबूर्णेवाडी या साडे दहा किलोमीटरच्या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचे भाग्य अखेर उजळले आहे. खड्ड्यांच्या विळख्यात अडकलेल्या या रस्त्याचे काम 'मुख्यमंत्री ग्रामसडक योजने'तून अत्यंत गतीने सुरू झाले असून, लवकरच या मार्गावरील प्रवास खड्डेमुक्त आणि सुखकर होणार आहे.
पांढरेपाणी ते केंबूर्णेवाडी या दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने पर्यटक, शिवभक्त आणि स्थानिक ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे 'दै. पुढारी' आणि 'पुढारी न्यूज'ने सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. प्रशासकीय पातळीवरील या पाठपुराव्याची दखल घेत अखेर या साडेदहा किलोमीटर रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.