कोल्हापूर

बिद्री निवडणूक ; मुरगुड मध्ये दुपारपर्यंत ५० टक्‍के मतदान

निलेश पोतदार

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुरगुड तालुका कागल या शहरांमध्ये बिद्री सहकारी साखर कारखान्यासाठी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 50 टक्के मतदान नोंदवले गेले. मुरगुड मध्ये तीन मतदान केंद्रांवर एकूण 1176 मतांपैकी 613 मतदान नोंदवले गेले.

कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील व मुरगुडचे माजी नगराध्यक्ष व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रवीण सिंह पाटील या दोघांनी मुरगुड येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. रणजीत सिंह पाटील व प्रवीण सिंह पाटील हे दोन बंधू या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. दोघाही बंधूंनी आपल्या विजयाचा दावा व्यक्त केला आहे. सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते विरेंद्र मंडलिक यांनी ही मुरगुड मध्ये मतदान केले.

मतदान नोंदणी करून घेण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे पहावयास मिळाले. मतदानासाठी मतदारांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर लागल्या होत्या. मुरगुड सारख्या संवेदनशील शहरामध्ये अतिशय शांततेत मतदान होत आहे. सत्तारूढ महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी मधून प्रवीण सिंह पाटील तर राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीकडून रणजीत पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. मुरगुड शहरातून कोणती आघाडी मतदान जागा घेणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुरगूडवर विशेष लक्ष केंद्रित झाल्याचे पहावयास मिळत आहे.

पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष भाजप नेते समरजीत सिंह घाटगे, गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT